ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील स्थानिक निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे संकेत !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान करत संकेत दिले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती एकत्रित लढवेल, तर ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरू शकते, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत दिले.

तसेच मुख्यमंत्र्यांनी बहुतांश ठिकाणी महायुती होईल. मात्र, शक्य नसेल अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील असे पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांविषयीही त्यांनी भाष्य केले. या महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढतील. यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी संकेत दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

दिवाळीनंतर, म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत या निवडणुका होतील. प्रस्तावित निवडणुकांत बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती होईल. मात्र शक्य नसेल, अशा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. मुंबई महापालिकेत महायुती असेल. मात्र पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका भाजप शिवसेना एकत्र तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढतील.

भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची जोरदार चर्चा आहे. या जागेसाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. मात्र, अद्यापर्यंत अध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. या नावांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची देखील चर्चा होत आहे. यावर भाष्य करताना फडणवीसांनी हे वृत्त फेटाळले आणि या पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. २०२९ पर्यंत मी राज्यातच काम करावे, अशी पक्षाची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!