ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विद्यार्थ्यांना महत्वाची बातमी : उद्यापासून मिळणार परीक्षेचे हॉलतिकीट

पुणे : वृत्तसंस्था

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने उद्या बुधवार (दि. ३१) पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले हॉलतिकीट प्राप्त करू शकतात. हॉलतिकिटासाठी शाळांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार, सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी दहावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हॉलतिकीट विद्यार्थ्यांना देताना त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये. तसेच हॉलतिकिटावर मुख्याध्यापक यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉलतिकिटामध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात.

हॉलतिकिटावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. एखाद्या विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित शाळांनी पुन्हा हॉलतिकीट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्याकडे हॉलतिकीट द्यावे, असेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!