पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८ वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा आता ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (CTET) आणि राज्याची शिष्यवृत्ती परीक्षा एकाच दिवशी, म्हणजेच ८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली होती. राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक स्वतः ‘सीटीईटी’ प्रविष्ट होत असतात. एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या परीक्षा आल्याने शिक्षकांची गैरसोय होणार होती. त्यामुळे शिक्षक व विविध संघटनांकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी सातत्याने होत होती.
या मागणीची दखल घेत परीक्षा परिषदेने परीक्षेचा दिनांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबबतचे आवाहन केले असून सर्व विद्यार्थी, पालक, शाळा आणि परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत (शिष्यवृत्ती) दिली जाते. परीक्षेच्या तारखेत बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिरिक्त दोन आठवड्यांचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे पालकांनी आता २२ फेब्रुवारी या नव्या तारखेनुसार मुलांच्या अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांमधील प्रज्ञा शोधण्यासाठी ‘शिष्यवृत्ती परीक्षा’ घेतली जाते. ही विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत मिळवण्याची एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. या परीक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर विद्यार्थ्यांची विचारक्षमता वाढवणे आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांची (MPSC/UPSC) शालेय स्तरावरच पायाभरणी करणे, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.