गुरुशांत माशाळ
दुधनी : अक्कलकोट तालुक्यात लंपी आजाराचा शिरकाव होऊन हा आजार हळुहळू उग्ररुप धारण करत असल्याने शेतकर्यामधून चिंता व्यक्त केली जात आहे.सध्या तालुक्यात दोन दिवसात हंजगी,तडवळ व हंद्राळ गावातून तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे.काल हंजगी येथील गुरुबसप्पा हालोळे यांच्या शेतातील बैलाला लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने एका बैलाचा मृत्यू झाला आहे. गावात गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याची चर्चा सुरु होती. शेवटी आज एका बैलाचा मृत्यू झाल्याने गावातील पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या तालुक्यात अनेक गावात जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चर्चा सुरु आहे.सध्या जेऊर गटात 60 ते 70 जनावरे लंपी आजाराने ग्रासले गेले आहेत. जनावरांच्या आजारावर उपचार करुन ही प्रतिसाद मात्र मिळत नसल्याने पशू वैद्यकीय अधिकारी ही हतबल झाले आहेत. ऐन रब्बी हंगामात गाय,म्हैस व बैलांचा या लंपी आजारामुळे मृत्यू होत असल्याने शेतकरी कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळताना दिसून येत आहे. हंजगी येथील गुरुबसप्पा हालोळे यांचा एक बैल लंपी आजाराने मृत्यू झाल्याने सध्या हालोळे कुटुंबीयांना रब्बी हंगामात पेरणी कशी करायची ? हा मोठा प्रश्न येऊन ठेपला आहे. संबंधित हंजगी गावचे सरपंच भाग्यश्री हालोळे, जेऊर पशुवैद्यकीय अधिकारी उटगे, पोलीस पाटील मोहन वाघमोडे आदींनी गुरुबसप्पा हालोळे यांच्या शेतात जाऊन मृत बैलाचा पंचनामा करुन अहवाल तयार करुन वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. गुरूबसप्पा हालोळे यांच्या बैलाला अनेक वेळा उपचार करुन देखील बैलाचा आजार बरा न झाल्याने शेवटी या बैलाचा मृत्यू झाला आहे.
भर रब्बी हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने गुरुबसप्पा हालोळे यांच्या कुटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले आहे.आता तालुक्यात गावा-गावात लंपी आजाराचा शिरकाव होत असल्याने शेतकर्यात चिंता वाढली आहे.लंपी हा आजार पशूमध्ये होणारा प्रमुख संसर्गजन्य रोग असल्याने पशुपालक शेतकरी बांधवांत ही चिंता वाढली आहे.आजपर्यंत या आजारावर कोणताही ठोस उपचार नसल्यामुळे, केवळ लस या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करू शकत असल्याचे बोलले जात आहे.
आजार ग्रस्त जनावरांना विलगीकरणात ठेवणे गरजेचे
सध्या तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भावात वाढ होत आहे. खास करुन जेऊर मंडळात तीन पशुवैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.लस झाल्यानंतर अठ्ठावीस दिवसानंतर जनावरात प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. परंतु हा आजार संसर्गजन्य असल्याने आजार ग्रस्त जनावरांना विलगीकरणात ठेवणे गरजेचे आहे.- तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मुरुमकर.
तीन दिवसात जेऊर गटात तीन जनावरांचा मृत्यू
सध्या जेऊर गटात दिवसेंदिवस लंपी आजाराचा प्रादुर्भावात वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसात जेऊर गटात तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे,तर 60 ते 70 जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव झाला आहे – जेऊर पशुवैद्यकीय अधिकारी अधिकारी उटगे.