ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात तयारी लोकसभा निवडणूकीची प्रचार मात्र विधानसभेचा !

अक्कलकोट : मारुती बावडे

सध्या अक्कलकोट तालुक्यात तयारी लोकसभेची मात्र त्याच्याआडून विधानसभेवर लक्ष ठेवण्यात येत आहे.भाजपकडून गाव चलो अभियान जोरात राबविले जात आहे. तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाचे लॉन्चिंग करून माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी गावागावात रान पेटविले आहे.यावेळी बहुजन समाजातील नाराजी काँग्रेसला फायदेशीर ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष ऍक्टिव्ह झाले आहेत. कोण कोणाबरोबर जाणार आणि अंतिम चित्र काय असेल याबाबतची निश्चितता नसली तरी प्रत्येक जण आपापला समाज आणि पक्ष याकडे लक्ष देताना दिसत आहे.काँग्रेसकडून लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची अधिकृत चर्चा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.आमदार प्रणिती शिंदे डॅशिंग आणि युवा नेतृत्व असल्याने कार्यकर्त्यांचा विश्वास वाढला आहे.नवीन चेहरा म्हणून त्यांना पसंती देत आहेत.मागच्यावेळी झालेली चूक आम्ही सुधारत आहोत अशा प्रकारचा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे देखील जुने आणि युवा अशा दोन्ही कार्यकर्ते व नेते मंडळींना वैयक्तिक गाठीभेटी घेऊन सुसंवाद साधत आहेत. पक्षांतर्गत नाराज असलेल्या नेतेमंडळींची मनधरणी करत आहेत.मधल्या काळामध्ये देशपातळीवर तसेच स्थानिक पातळीवर दलित आणि मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे त्या अन्यायाचा वचपा काँग्रेस या माध्यमातून काढण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचा मुख्य मतांचा गठ्ठा हा बहुजन समाजाच आहे तो मधल्या काळात विस्कळीत झाला होता.यावेळी मात्र तो पुन्हा एकत्रित येताना पाहायला मिळत आहे.जर या मतांचे एकत्रीकरण झाले तर काँग्रेस पुन्हा उभारी घेण्याची शक्यता आहे.नुकताच अक्कलकोट मध्ये दलित समाजाचा झालेला मोर्चा हे त्याचे प्रतीक मानले जात आहे. दुसरीकडे भाजपनेही आयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा केला आहे.यातून हिंदू समाजाचे एकत्रीकरण करून त्याचा फायदा निवडणूकित करून घेण्याची रणनीती त्यांनी आखली आहे.हे स्थानिक पातळीवरच होत आहे असे नाही तर देशपातळीवरून या मुद्द्यावर फोकस केले जात आहे.याचा फायदा भाजपला होऊ शकतो.तालुक्यात भाजपने गाव चलो अभियानाच्या माध्यमातून आपल्या दोन टर्ममध्ये केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोचवत पुन्हा एकदा भाजपला संधी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.काही गावात भाजपचे नेतेमंडळी मुक्कामाला असून त्या माध्यमातून जुन्या नेतेमंडळीशी संवाद साधत आहेत.

केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी मतदार संघासाठी आणला आहे.त्याचे भूमिपूजन आणि लोकार्पण अनेक ठिकाणी होत आहेत.भाजपकडून लोकसभेचा उमेदवार सध्या तरी निश्चित नाही परंतु उमेदवार कोणी का असेना तयारी म्हणून भाजपने मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे.भाजपने दरवेळी नव्या उमेदवाराला समोर आणून विरोधकांची गोची करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण यावेळी तो उमेदवार स्थानिक असावा आणि कार्यक्षम असावा,अशी अट कार्यकर्त्यांनी नेते मंडळींकडे घातल्याची चर्चा आहे.भाजपमध्ये सध्या लोकसभेसाठी अनेक नव्या उमेदवारांची चर्चा आहे पण त्यात खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा एक जातीच्या दाखल्याचा मुद्दा वगळला तर सर्व उमेदवारापेक्षा ते प्रभावी ठरू शकतात अशी चर्चा मतदारसंघात पुन्हा एकदा रंगली आहे.काँग्रेसमधले काही लोक पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत.सत्तेचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.भाजपमध्ये सर्व काही ठीक आहे अशी परिस्थिती नाही.तिथले काही जुने निष्ठावंत कार्यकर्ते हे आपल्याला विश्वासात घेत नसल्याने नाराज आहेत.सध्या तालुक्यात कोणत्याही निवडणुका नाहीत.त्यामुळे कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रकारची संधी नाही.
सध्या तालुक्यात सत्तेसाठी इकडून तिकडे करत असलेल्या लोकांची चर्चा जास्त आहे जे खरे निष्ठावान आहेत ते आपापल्या पक्षात नेते मंडळीला धरून आहेत.यात काही लोक भूतकाळ विसरून सत्तेच्या मागे लागले आहेत. काही लोक चलती का नाम गाडी म्हणून निर्णय घेत आहेत.काही लोक आजी – माजी लोकप्रतिनिधींच्या बाबतीत तुलनात्मक अभ्यास करून आपापली जागा निश्चित करत आहेत.या सर्व परिस्थितीमध्ये आधी लोकसभा निवडणुका होतील. त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यानंतर डिसेंबरमध्ये कदाचित नगरपालिका निवडणुका होतील. त्यानंतर मार्चच्या आधी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे दोन्ही पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याबरोबरच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्ते आणि नेते मंडळाची एक प्रकारे परीक्षा घेणार आहेत.या परीक्षेत जे लोक पास होतील.त्यांना उमेदवार म्हणून संधी मिळेल.या दोन निवडणुकांमधून भावी जिल्हा परिषद, भावी पंचायत समिती सदस्य, भावी नगराध्यक्ष,भावी नगरसेवक ठरणार आहेत हे मात्र नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!