अक्कलकोट : मारुती बावडे
सोशल मीडिया रीलच्या जमान्यात आजीबाईंच्या जात्यावरच्या ओव्या जवळपास लुप्त झाल्या आहेत.अगदी बोटावर मोजण्या इतपत या जर कुठे असतील तर त्याही ग्रामीण भागातच पाहायला मिळतील यामुळे ग्रामीण संस्कृती मात्र हरवत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.या गोष्टींना आता गतवैभव मिळणार की नाही हे सांगणे देखील मुश्कील आहे.कारण जगच इतके फास्ट झालेले आहे याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही.भविष्यकाळात या गोष्टी आपल्याला केवळ पुस्तकातच वाचायला मिळतील की काय अशी शंका घेण्यास वाव आहे.
अलीकडच्या काळात तंत्रज्ञानामुळे अनेक बदल घडत आहेत त्याचा परिणाम काही क्षेत्रावर झाला असून विशेषतः ग्रामीण भागातील काही जुन्या परंपरा लोप पावत चालल्याचे चित्र आहे.त्याचेच एक उदाहरण म्हणजे जात्यावरच्या ओव्या.हा प्रकार तर आता ग्रामीण भागातून आता हद्दपार होत चालला आहे.याची जागा पिठाच्या गिरणीने घेतली असून यामुळे जात्यावर दळण्याचा प्रकार जवळपास बंद झाला आहे.यामुळे आजीबाईंचा त्रास वाचला आहे आणि आत्ताच्या आजीबाई हे करायला तयार पण नाहीत.कष्ट नावाची गोष्टच राहिली नाही.सर्व काही रेडिमेडचा जमाना आला आहे त्यातून मानसिकताही बदलत चालली आहे.यातून खरे तर अंगाला जी मेहनत होती ती मात्र सध्याच्या या आधुनिकतेच्या जमान्यात कुठे पाहायला मिळत नाही.तसे पाहिले तर भारतीय संस्कृतीचे खरे दर्शन आजही ग्रामीण भागातच पाहायला मिळते.कारण औद्योगिककरणामुळे आणि वाढत्या शहरीकारणामुळे शहरातून यापूर्वीच अशा गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.त्या ठिकाणी केवळ आठवणी राहिल्या आहेत.दुसरीकडे हळू हळू आता ग्रामीण भाग ओस पडत असून याबाबतीत अतिशय दुर्मिळ चित्र कधी तरी पाहायला मिळते.एखाद्या घरात दुर्मिळ वयस्कर आजीबाईकडे ओव्या ऐकायला मिळतात.त्यांचा आवाज म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा कणा म्हटल्यास वावगे ठरणार नाही.पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात एप्रिल,मे महिन्यात उन्हाळ्यात शेतात काम नसली की झाडाखाली अथवा अंगणात बसून महिला जात्यावर गाणे म्हणत वर्षभराचे नियोजन करत असत.ती परंपरा दुर्मिळ झाली आहे.भारतीय संस्कृतीत जात्याला विशेष महत्व आहे.हिंदू संस्कृतीत लग्न समारंभावेळी अगोदर जात्याचे पूजन करून लग्न कार्याला आरंभ केला जातो.अशा अनेक विविध दुर्मीळ गोष्टींचे दर्शन ग्रामीण भागात पाहायला मिळत असते.त्यापैकी जात्याची एक गोष्ट आहे.तसे पाहिले तर आता पर्यंत विज्ञानामुळे अनेक क्रांतिकारी बदल झाले आहेत त्यात ही परंपरा मात्र इतिहास जमा होत आहे हे एक नक्की.
ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन व्हावे ग्रामीण भागात आता पर्यंत अनेक गोष्टींचा बदल झाला आहे हे जरी खरे असले तरी तोटाही झाला आहे.शहरीकरणाचे वारे हळू हळू ग्रामीण भागाकडे येत आहेत त्याचा एक परिणाम म्हणूनच याकडे पाहावे लागेल.आणि अशा गोष्टी टिकून राहाव्या यासाठी जाणीवपूर्वक आता प्रयत्नांची पण गरज आहे असे वाटते.
– प्रा.ललिता लवटे,अक्कलकोट कॉलेज
जुन्या पिढीकडून महिलांनी शिकावे
मध्यंतरी महिलांच्या बाबतीत एक सर्वेक्षण समोर आले.त्यात आजकालच्या महिला या बऱ्याच अंशी वेळ हा सोशल मीडियातील रिल बनवण्यातच घालतात, असे निरीक्षण समोर आले आहे.रील बनविण्याला विरोध नाही परंतु जुन्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरा देखील आपल्यातल्या जुन्या घरातल्या पिढीकडून शिकून घेऊन त्या पुढे चालू राहाव्यात यासाठी त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.