सचिन पवार
कुरनूर, दि.१९ : सालाबादप्रमाणे याहीवर्षी कोरोना नियमाचे पालन करून अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे दत्त मंदिरात श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिराला जागा दान केलेले विनायक पोतदार, सतीश सलगरे व शंकर कलशेट्टी यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता श्री दत्ताच्या मूर्तीस अभिषेक करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दुपारी १२ वाजता पारंपरिक पद्धतीने गावातील भजनी मंडळांनी व दत्त भक्तांनी मोठ्या उत्साहात दत्त प्रतिमेचा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर जय भवानी भजनी मंडळ कुरनूर यांनी भजन सादर केले. संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त भक्तांनी व समस्त ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी पुन्हा श्री विठ्ठल- रुक्माई भजनी मंडळ (सरसंबा) यांनी उत्कृष्ट भजन सादर करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमास मंदिर समितीचे अध्यक्ष मारुती बावडे, ह.भ.प आबा महाराज (कुरनूरकर), तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे, अशोक काळे,अप्पू काळे, भागवत पोतदार, नारायण चेंडके, बाबासाहेब कुंभार, लक्ष्मण सुरवसे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे पुजारी धोंडीबा धुमाळ, सतीश सलगरे, किरण सुरवसे, नामदेव केंगार, सचिन पवार, अप्पा खांडेकर, अप्पा चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.