ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये बहुचर्चित ट्रामा केअर सेंटरचे उद्या लोकार्पण

आरोग्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांची उपस्थिती

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

बहुचर्चित गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अक्कलकोट ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण उद्या (बुधवारी) राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते केले जाणार आहे.साधारण तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीचे लोकार्पण होत असल्याने अक्कलकोटकरांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

बुधवारी, सकाळी ९ वाजता ट्रामा केअर युनिटच्या प्रांगणामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार,अभियान संचालक नवीन सोना, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर,उपसंचालक डॉ.राधाकृष्ण पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे,डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र बनसोडे, तहसीलदार विनायक मगर, मुख्याधिकारी सचिन पाटील, उपविभागीय अभियंता अमोल खमितकर आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारीच बांधण्यात आलेल्या ट्रामा केअरमध्ये वीस बेड राहणार असून यात एक्स-रे मशीन, सोनोग्राफी ,हाडांचे डॉक्टर, सर्जरी उपलब्ध असणार आहे.दहा सर्वसाधारण बेड तसेच दहा आयसीयू बेडचे हे युनिट असून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हे युनिट कार्यान्वित करण्याची मागणी अक्कलकोटवासियातून केली जात होती.त्याला अखेर मुहूर्त प्राप्त झाला आहे.

या ट्रॉमा केअरला २०१३ साली मंजूर मिळाली होती आणि २०१५ साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर दीर्घकाळ हे काम रखडले होते.हा प्रकल्प २०१२१ साली पूर्ण झाला असून यावर शासनाने २ कोटी ९० लाख रुपये खर्च केले आहेत.आता प्रत्यक्षात आरोग्य सेवेची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे.या दृष्टीने आरोग्य विभागाने लोकार्पणाची तयारी पूर्ण केली असून उद्या विविध मान्यवरांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!