अक्कलकोट : शरीर चांगले राहण्यासाठी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनीही याची जास्ती जास्त लागवड करून याचे महत्त्व आणखी वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अक्कलकोट येथे रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
नगरपरिषद भाजी मार्केट अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या या रानभाजी महोत्सवाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रानभाज्या पावसाच्या पाण्यावर सहज उगवून येत असल्याने शेतकऱ्यांना हा एक सोपा मार्ग आहे. त्याशिवाय या रानभाज्या मानवी आरोग्यास खूप लाभदायी असून यातून निसर्गाने मानवाला खूप मोठे वरदान दिलेले आहे. अशा आरोग्यदायी रानभाज्यांचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांनी त्याची व्यावसायिक पद्धतीने लागवड करून विक्रीसाठी प्रयत्न करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगरपालिकेचे पक्ष नेते महेश हिंडोळे, शहराध्यक्ष शिवशरण जोजन , ज्येष्ठ नेते प्रभाकर मजगे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर आदी उपस्थित होते.
मैंदर्गी येथील शेतकरी कल्लाप्पा काळे यांनी १३ गुंठे क्षेत्रावर सर्व प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे .रानभाजी व त्याचे औषधी गुणधर्म याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी केले. या कार्यक्रमास खंडागळे, धुमाळ यांच्यासह करजगी मंडळाचे कृषी अधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन सर्व कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांनी केले होते.