---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात ८५ हजार हेक्‍टरवरील खरिप पिके धोक्यात; पावसाअभावी शेतकरी हवालदिल

Follow Us:
---Advertisement---

मारुती बावडे

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात यंदा सुरुवातीच्या काळात वेळेवर पाऊस झाल्याने ८५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे .परंतु आता ऐन पीक वाढीच्या वेळी मात्र पाऊस गायब झाला आहे.  त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  कोरोना संकटामुळे एकीकडे रोजगार बुडाला तर दुसरीकडे आता शेतीच्या आशेवर काही करण्यासारखे होते मात्र यावर्षी शेतीत देखील निराशाच दिसत आहे.

अक्कलकोट शहर आणि तालुक्यात यंदा मान्सून वेळेवर पोचल्याने आणि वेळेवर खरीप पेरण्या झाल्याने खरीप पीकाची वाढ ही चांगल्या प्रकारे झाली आहे. खरीप पीक फूल- फळ धारणेत असतानाच तालुक्यात अचानक पाऊस गायब झाल्याने खरीप शेतकरी,  ऊस उत्पादक शेतकरी तसेच फळबाग शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

तालुक्यात चपळगाव, जेऊर, करजगी, तडवळ,मंगरुळ, हंजगी जेऊरवाडी, हंद्राळ, शेगाव,  कोर्सेगाव आदी भागात यंदा सुरुवाती पासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सध्या या भागातील खरीप पीके माना टाकताना दिसून येत आहेत. तर काही बागायतदार शेतकरी खरीप पीक वाचविण्यासाठी स्प्रिंकलरच्या साह्याने अथवा सरीद्वारे पाणी देताना दिसून येतात.

सध्या हवामान अंदाजानुसार १५ ऑगस्ट नंतरच तालुक्यात पाऊस होणार असल्याचे बोलले जात आहे. १५ ऑगस्टच्या पुढे जर का पाऊस लांबल्यास शंभर टक्के खरीप पीक वाया जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सध्या तालुक्यात पंधरा दिवस उलटून गेले पाऊस गायब झाला आहे. यामुळे तालुक्यातील खरीप व ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

तालुक्यात एकूण ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा खरीप पेरणी झाली आहे.यामध्ये ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर, १९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर उडीद, ७ हजार हेक्टर क्षेत्रावर मूग, ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ४ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुल, १ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा तर १२ हजार ५०० हेक्टरवर ऊस असे एकूण जवळपास ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा खरीपाची पेरणी झाली आहे.अशा वेळी तालुक्यात पाऊस लांबल्यास तालुक्यातील खरीप पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे !
कधी एकदा तालुक्यात दमदार पाऊस होऊन खरीप पिकांना जीवदान मिळेल
असे शेतकऱ्यांना झाले आहे. म्हणून बळीराजा आकाशाकडे नजरा लावून बसला आहे.सध्या तालुक्यातील खरीप पीक सलाईनवर असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे – दिलीप काजळे,चुंगी शेतकरी

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!