मुंबई : वृत्तसंस्था
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी केलेल्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, ”पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला साथ देण्यासाठी कोणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊ. पण मला याबद्दल कुठलीही माहिती नाही. जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. ते माझ्या संपर्कात नाहीत. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काहीही बोलणार नाही”, असे बावनकुळे म्हणाले.
तसेच पुढे ते म्हणाले, ”विजय वडेट्टीवार यांच्याविषयी नितेश राणे यांनी काय ट्विट केले, ते मला माहिती नाही. पण विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील आमच्या संपर्कात नाहीत. पण उद्या काय होईल सांगता येत नाही, लोकांचे विचार दररोज बदलतात. भविष्यात आत्मनिर्भर भारत होईल अशी गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिला आहे. त्यामुळेच संपूर्ण देशभर मोदींच्या नावाने तिसऱ्यांदा सरकार येईल असंच वारं सध्या देशभर दिसते”, असेही ते म्हणाले.
तसेच ”राहुल गांधी जिथे- जिथे जातील तेथे त्यांना मोदींच्या जयजयकाराच्या घोषणा ऐकू येतील. कारण, मागील दहा वर्षांत मोदींनी देश बदलला आहे. गरीब, मध्यमवर्गीयांचे कल्याण पंतप्रधानांनी केले आहे. त्यामुळे देशातील जनता मोदी यांच्याच पाठीशी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या गॅरंटीवर विश्वास ठेऊन त्यांना साथ देण्यासाठी अनेकजण भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. काहीजण तयारीत आहेत तर काही जण पुढील काळात तयारी करतील”, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
दरम्यान, भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्याने भाजपमधील काहीजण नाराज आहेत असे विचारले असताना त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रप्रथम या विचारधारेवर काम करणारे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे भाजपमध्ये कुणीही आले तरी ते नाराज होत नाहीत. एखाद्या कार्यकर्त्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यास त्याची नाराजी दूर करुन तो पुन्हा कामाला लागतो असेही चंद्रशेख बावनकुळे यावेळी म्हणाले.