दुधनी नगरपरिषदेवर ‘नारीशक्ती’चा प्रभाव
२० पैकी १० जागा महिलांसाठी राखीव; काहींना धक्का, काहींना दिलासा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दुधनी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा ‘नारीशक्ती’चा प्रभाव ठळकपणे दिसून येणार आहे. नव्याने रचलेल्या १० प्रभागांमधील एकूण २० नगरसेवक पदांपैकी तब्बल १० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणात महिला नेतृत्वाला नवे बळ मिळणार असून, निवडणूक रिंगणात महिला उमेदवारांचा मोठा वावर दिसणार आहे.
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर नगरसेवक पदाच्या आरक्षणाची सर्वांनाच उत्सुकता होती. बुधवारी अखेर या आरक्षणाचा सोडत कार्यक्रम पार पडला आणि वातावरणात एकच चर्चा सुरू झाली कोणत्या प्रभागात कोणाचे नशीब खुलले ? काही इच्छुकांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला, तर काहींसाठी अनपेक्षित धक्का.
नगरपरिषद सभागृहात उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, व कार्यालयीन अधीक्षक विनोद राकुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षणाची घोषणा करण्यात आली. यावेळी दुधनी बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. उदय म्हेत्रे, अतुल मेळकुंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
काही उमेदवारांनी आपल्याच प्रभागात अनुकूल आरक्षण निघेल, या आशेने प्रचाराची प्राथमिक तयारीही सुरू केली होती; मात्र सोडतीत समीकरण बदलल्याने अनेकांना पर्यायी मार्ग शोधावा लागणार आहे. तर काहींच्या वाट्याला अनुकूल आरक्षण येताच त्यांच्या गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
🔹 आरक्षणाचा तपशील
प्रभाग १: (अ) अ.जा. (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग २: (अ) ना.मा.प्र. (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग ३: (अ) अ.ज., (ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ४: (अ) ना.मा.प्र. (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग ५: (अ) सर्वसाधारण (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग ६: (अ) ना.मा.प्र., (ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ७: (अ) अ.जा., (ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ८: (अ) ना.मा.प्र., (ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ९: (अ) ना.मा.प्र. (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग १०: (अ) सर्वसाधारण (महिला), (ब) सर्वसाधारण
दुधनी नगर परिषदेच्या स्थापनेनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडून नगरभवनापर्यंतचा प्रवास आता स्त्रियांसाठी खुला झाला अशी भावना व्यक्त होत आहे. शिक्षित, सामाजिक आणि तरुण महिलांना स्थानिक पातळीवर काम करण्याची नवी संधी मिळणार आहे.
२०१६ साली नगरपरिषदेत एकूण ८ प्रभाग व १७ सदस्य होते; मात्र लोकसंख्येतील वाढ लक्षात घेऊन यंदा प्रभागसंख्या १० करण्यात आली असून सदस्यसंख्या २० इतकी झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ही रचना निश्चित करण्यात आली आहे. परिणामी काही जुन्या नगरसेवकांच्या हद्दीत फेरबदल झाला असून, त्यांचा राजकीय जनाधार हलवला गेला आहे. काहींसाठी ही परिस्थिती अनुकूल तर काहींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने, या ठिकाणची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. सध्या तरी भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.