ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खरेच सोलापूरच्या विकासातील मुख्य अडसर विमानसेवा आहे?

सोलापूर : कोणत्याही शहराला विमानतळ आणि विमानसेवा असणं हे कधीही चांगलं, हे माझं तसं प्रामाणिक आणि अट्टहासाचं मत आहे. तसं ते सोलापूरलाही असलंच पाहीजे, याबाबत दुमत असण्याचं कोणतंही कारण नाही. पण एखाद्या सोलापूरसारख्या शहराच्या विकासात विमानसेवा नसणं हा मुख्य अडसर आहे? हा प्रश्न मात्र मनाला पडल्याशिवाय राहात नाही. अथवा विमानसेवा नाही म्हणून सोलापूरच्या विकासाचं चाक अडलं आहे? असं म्हणण्याइतपत आपण अडचणीत आहोत का? हा माझ्यापुढचा खरा प्रश्न आहे.

विमानांची सेवा सुरू नसतानाही सोलापूरला इथल्या माणसांनी गिरणगाव हे नाव दिलं. ते आपल्या श्रमाच्या बळावर. कितीतरी पिढ्या आधी पद्मशाली समाजाच्या आगमनानंतर सोलापूर हे आधी सुताचे, मग कापडाचे आणि पुढे चादरीचे अणि अगदी अलिकडे टर्कीस टॉवेल व गणवेशाचे हब झाले. ‘लक्ष्मी विष्णू’सारखी मिल राज्यस्थानातील दमाणी बंधूंनी येऊन काढली. खरे तर ते कोणत्या विमानाने सोलापुरात उद्योग सुरू करायचा म्हणून आले होते? हे तपासावे लागेल. शंभरहून अधिक वर्षे ही मिल चालली. त्याच्या जोडीला अनेकांनी सोलापुरात गिरण्या काढल्या. यातले कुणीही विमानसेवा नाही म्हणून रडल्याचे ऐकिवात तरी आहे का? रेल्वेचा त्यांना नक्की फायदा झाला असणार. जो आजही होऊ शकतो. बरं तेव्हाच्या रेल्वे आजच्यासारख्या साडेतीन तासात पुण्यात आणि आठ तासात मुंबईला सोडण्याइतक्या फास्ट अजिबात नव्हत्या बरं! तरी ते आलेच ना! तेव्हा पुण्याला जाण्यासाठी दिवसातून एखाद दुसरी गाडी असायची. खासगी कार तर एक दोघाकडे. रस्तेही असे होते म्हणे की तीस चाळीसचा स्पीडही खूप झाला. आजच्यासारखे 120-140 कॉमन नव्हते. तरी त्यांनी सोलापुरात येऊन उद्योग केलाच ना! सोलापूरच्या विकासाला त्यांनी हातभार लावलाच ना! कि विमान नाही म्हणून रडत बसले.

आता सोलापूरच्या विमानसेवेबद्दल बोलूत. सोलापूरला विमानसेवा नाही म्हणून उद्योगधंदे येत नाहीत आणि सोलापूरचा विकास होत नाही. विमानसेवा सुरू होत नाही, कारण सिध्देश्वरची चिमणी आडवी येते, असा या शहरातील काही डोमकावळ्यांचा आक्षेप आहे. मला अजूनही एक कोडं उलगडलेलं नाही की किती उद्योगांनी विमानसेवा नाही म्हणून सोलापूरला यायला नकार दिला? याची काही कुणाकडे आकडेवारी आहे काय? किती उद्योजक विमानसेवा नसल्याने सोलापुरात गुंतवणूक करू शकत नाही? असं म्हणालेत याचा डाटा कुणाकडे आहे का? विमानसेवा नाही म्हणून एखाद्या उद्योजकांने नाराजी व्यक्त करणं वेगळं आणि विमानसेवा नाही म्हणून मी गुंतवणूक करणार नाही, असं घोषित करणं वेगळं. या दोन गोष्टीची गफलत न करता स्पष्टपणे सोलापूर विकास मंचमधील एकतरी झोलर जाहीरपणे पुढे येऊन सांगेल काय?

चला ते ही मान्य. विमाने उद्योजक येतो की कच्चा माल? की पक्का माल जातो? सरळ विचारायचे तर विमाने ही मालवाहतुकीसाठी आहेत की मालक वाहतुकीसाठी? अर्थातच मालकवाहतुकीसाठी! आजमितीला कच्चा माल आणि पक्का माल ट्रान्सपोर्टसाठी भारतात सर्वात छान पर्याय रोड आणि रेल्वे हेच आहेत. विमानाने कंपनीचे मालक आणि उच्चपदस्थ अधिकारीच प्रवास करीत असतात. बहुतांश कंपनीचे मालक हे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद आणि अशा तत्सम शहरांनी राहतात. पाचशे कोटीहून अधिकची गुंतवणूक करणारा कोणत्याही कंपनीचा मालक स्वत:च्या मालकीचे विमान बाळगतोच. जर मालकीचे नसेल तर भाड्याने का होईना घेतोच. त्याला तेवढ्यापुरतं उतरायला सोलापूरचे विमानतळ सिध्देश्वरची चिमणी असतानाही सक्षम आहे की नाही? याचे उत्तर ‘आहे’ हेच आहे. कारण सोलापूरच्या विमानतळावर केंद्रीय व राज्यातील मंत्र्याची विमाने उतरतात. ते ही चिमणी असताना. जर पाचशे कोटी वा त्याहून मोठी गुंतवणूक कणार्‍या मालकाला खासगी विमानाने यायची जायची अडचणच नसेल तर अडचण कशात आहे? इथेच तर सोलापूर विकास मंचवाले करीत असलेल्या धुळफेकीची मेख आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे समजा त्याहून छोटी गुंतवणूक करणार्‍या उद्योजकांची अडचण आहे, असेही गृहीत धरू. सोलापुरात जळगावहून आलेल्या शरद ठाकरे यांनी उभी केलेली एलएचपीला काय अडचण आली? त्यांनी तर लॉकडाऊनमध्येही कंपनी एक दिवसही बंद केली नाही कारण त्यांच्याकडे भारताच्या लष्करी सेवेला लागणार्‍या सामुग्रीचं उत्पादन होत होतं. सोलापुरात आंध्रातून येऊन बालाजी अमाईन्स उभी करणार्‍या रेड्डी यांना काय अडचण आली? विशेष म्हणजे ही जगातील दुर्मिळ केमिकलचे उत्पादन करणारी कंपनी आहे, बरं! आणि सगळ्यात महत्त्वाचं, सोलापूरकरांनो, ध्यान देऊन वाचाऽऽऽ यतीन शहा नावाच्या विमानतळ नसलेल्या सोलापुरातील माणसाने इंग्लंडच्या ‘जी क्लाएन्सी’च्या उद्योजकाला 51 टक्के भागिदारी देऊन, स्वत: 49 टक्के भागिदारी स्विकारीत चिंचोळी एमआयडीसीत तीसचाळीस एकरात प्रिसिजन नावाची कंपनी उभी केली. जिचा विस्तार सोलापुरातून चीन, नेदरलँड, जर्मनी आणि इंग्लंडपर्यंत गेला. विशेष म्हणजे या इंग्लंडच्या माणसाने पुढे यतीन शहा यंना कंपनीची शंभर टक्के मालकी देऊन आपल्या देशात म्हातारपणी सन्मानाने जगतो आहे. जर शोधल्या तर अशा चिंचोळी एमआयडीसीत आठ-दहा कंपन्या तरी सहजपणे सापडतील. आश्चर्य म्हणजे यातील काही उदोजक सुद्धा आपल्या कर्तुत्वाचा इतिहास विसरून आता विमाना विमान करताना दिसतात. मी चंद्रपूरला बल्लारपूर कागद पेपर इंड्रस्ट्रीजला भेट द्यायला गेलो होतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल त्या कंपनीचा मालक वीस वर्षांपासून कंपनीकडे फिरकलाही नव्हता. ना कंपनी तोट्यात गेली? ना बंद पडली ? सगळं उत्तम सुरू आहे. हवं तर खात्री करा. यापैकी कुणाला विमानाची अडचण आली? प्रश्न विमानाचा नाही. उद्योग सुरू करण्याच्या मानसिकतेचा नाही. विकास मंच चालविणार्‍या कितीजणांनी उद्योगात गुंतवणूक केली आहे. यांच्या गुंतवणुका या व्यापारात आहेत. आणि हे गप्पा मारतात, उद्योगात गुंतवणुकीच्या.

बरं सोलापूरला विमानसेवा नाही म्हणून उद्योजक येत नसल्याची करीत असलेली बोंब मान्य करू. मग आपल्या शेजारी लातूरला विमानतळ आहे, शिवाय चिमणी नाही. उस्मानाबादला विमानतळ आहे, तिथेही चिमणी नाही. मग तिथे विमाने घेऊन उद्योजक का जात नाहीत? तुम्हाला याहून आश्चर्य वाटेल की आपल्या शेजारी गुलबर्ग्याला विमानतळ आहे. विमानं येतात आणि जातात. नांदेडला विमानतळ आहे. विमानं येतात आणि जातात. गोंदियाला विमानतळ आहे. विमानं येतात आणि जातात. आपल्या शेजारच्या बिदरला तर लष्करी विमान चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र आहे, जिथे रात्रीसुध्दा विमान उतरू शकतात. मग या लातूर, उस्मानाबाद, नांदेड, गुलबर्गा, बिदर, गोंदिया या सगळ्यांनी शहरांनी किती मागच्या काही वर्षात गेले? याचा अर्थ उघड आहे की विमानसेवा आहे म्हणून उद्योग जात नाहीत. नाहीतर इथे जायलाच हवे होते. बाहेरुन येणाऱ्या उद्योगाला कच्चा माल, चांगले रस्ते, स्वस्त कामगारा, जागा, एमआईडीसी च्या सोई सुविधा आणि राजकीय इच्छाशक्ति लागते. ही सोलापूरची अडचणच नाही. आठही दिशांना फोर लेन. चोवीस तासात पुण्या-मुंबई-हैदराबाद-बेंगलोरला साठसत्तर ट्रेनची उपलब्धी उद्योगासाठी मोठी आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू असेल तरच उद्योग येतात हा भ्रम पसरविणे सोलापूर विकास मंचच्या कोल्ह्यांनी बंद करावे. काही जिल्ह्याच्या ठिकाणी विमानसेवा सुरु आहे ती उड़ान योजनेतून. केंद्र सरकार विमान वाहतूक वाढविन्यासाठी उड़ान मधील जिल्ह्याना होनारा तोटा भरून देताना वेगवेगळ्या स्लैब प्रमाणे ‘व्हीजिबिलिटी फंड’ च्या स्वरुपात सब्सीडी देते. ती सहा महिन्या साठीच आहे. विशेष म्हणजे यात राज्य सरकारांचाही वाटा आहे. सोलापुरपेक्षा जास्तीचे दरदोई उतपन्न असणाऱ्या जिल्ह्यातील विमानसेवा सुद्धा सब्सिडिवर चालू आहेत, हे महत्वाचे. सगळ्या सब्सिडी काढून घेणारे सरकार या सब्सिडीज काढून घेतल्यावर त्या विमानसेवा टिकतील का? याबाबत खुद्द सरकारला संशय आहे. तुम्हाला आणखी आश्चर्याची गोष्ट सांगतो. समजा उद्योजक मुंबईत विमानाने उतरला, तर त्याला स्वत:च्या उद्योगात जाताना त्याला बाय रोडच जावे लागते. मुंबई विमानतळापासून रसायनी, चेंबूर, पनवेल अशा ठिकाणच्या उद्योगात जायला किती वेळ लागतो? समजा उद्योजक पुण्यात विमानतळावर उतरला. तर पुणे-किंवा पिंपरी चिंचवडच्या उद्योगात जायला किती वेळ लागतो? हा कालावधी दोन तासापेक्षा कमी नाही. हिच गोष्ट नागपूरची आहे. औरंगाबाद विमानतळातून थोडाफार कमी वेळ लागत असेल! जर एखाद्याने सोलापुरात उद्योग टाकला तर त्याला पुणे विमानतळावरून अवघ्या साडेतीन चार तासात सोलापुरात पोहोचता येते. कोट्यवधी रुपये कमविणार्‍याला एवढा वेळ उद्योगासाठी देता येत नाही का? मग तरी सोलापुरात विमान नाही म्हणून उद्योग नाही ही बोंब कशासाठी? जरा माहिती घ्या, नाशिकची एमआयडीसी सोलापूरपेक्षा मोठी आहे. तिथे अहमदाबाद, बेळगाव, मुंबई अशा फ्लाईटस् सुरू झाल्या होत्या. पण महिना दोन महिन्यात बंद पडल्या. नाशिक हे दोन राज्याच्या बड्या शहरांपासून अत्यंत जवळचे मोठी एमआयडीसी असलेले शहर असूनही विमानसेवा बंद पडली. सोलापूरचे काय घेऊन बसले, बाबाहोऽऽ!
याचं कारण एक चांडाळचौकडी आहे. आता यांची वक्रदृष्टी धर्मराज काडादी यांच्यावर पडली. त्यांच्यांशी वैयक्तिक भांडण असणार्‍या काही राजकारण्यांनी विकास मंच वाल्यांचा वापर केला आहे. कादाडी यांना घेरण्याच्या नादातून त्यांनी सिध्देश्वर साखर कारखान्याला टार्गेट केले आहे. अन्यथा चिमणी यांच्या बुडाला एवढी टोचन्याचे कारण काय? याचे उत्तर कळत नाही. काडादी टोचत आहेत म्हणून ते काडादी सोडून चिमणीच्या मागे लागले आहेत. धर्मराज काडादी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली हस्ती आहे. कारखाना बंद पडला तर काडादींचा केसही वाकडा होणार नाही. नुकसान होणार आहे ते कारखान्यावर अवलंबून असलेल्या 25 हजार शेतकर्‍यांचं आणि 15 हजार कामगारांचं. चाळीस हजार माणसांच्या घरांनी प्रत्येकी चार माणसं जरी धरली तर दीड लाखाहून अधिक लोकांचे पोट विमानसेवा नाही म्हणून मारण्याचा अधिकारी विकास मंचच्या गाबड्यांना कुणी दिला?

राहता राहिला प्रश्न आम्हाला काय पाहीजे? आम्हाला दीडदोन लाखाचे पोट अवलंबून साखर कारखाना सांभाळून नवीन मोठे विमानतळ सोलापूरसाठी पाहीजे. कारखान्याची चिमणी काढूनही लहान धावपट्टीमुळे होटगी रोड विमानतळावरून मोठी प्रवासी विमाने चालू शकत नाहीत. धावपट्टी वाढवायची तर आणि सिध्देश्वरची चिमणी पाडायची ठरविले तरी एनटीपीसीची तीनशे मीटरची चिमणी पुन्हा आडवी येतेच. होटगी रोडवर विमानसेवा म्हणजे ‘खिळा मोडून विळा करण्या’सारखे आहे. होईल का? सोलापूरकरांनो झोलरांचा झोल समजून घ्या ! विचार करा आणि व्यक्त व्हा!
आम्ही भाकरीसोबत! आम्ही चिमणीसोबत!! आम्ही काडादींसोबत!!!

साभार – दैनिक संचार

दत्ता थोरे, सोलापूर
9922930208

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!