सांगली वृत्तसंस्था : राजकीय वर्तुळात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. “क्या बडा तो सबसे दम बडा आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही,” या त्यांच्या गाजलेल्या आव्हानाची प्रचिती ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालातून आली असून, याच वाक्याचे पोस्टर्स शहरभर झळकू लागले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपासह महायुतीने तगडी रणनीती आखली होती. दिग्गज नेते, मोठी फौज आणि आक्रमक प्रचाराच्या जोरावर पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने तब्बल २३ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांची गणिते कोलमडून टाकली.
विजयानंतर ईश्वरपूर शहरासह राजारामबापू सहकारी साखर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर्स आणि फलक झळकू लागले आहेत. “सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही” हे वाक्य मोठ्या अक्षरात झळकत असून, हे फलक सध्या जिल्ह्यासह राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांकडून जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीची टीका करण्यात आली होती. त्या टीकेला आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी या बॅनर्समधूनच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ईश्वरपूर नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवत जयंत पाटील यांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली होती, तरीही निकाल जयंत पाटील यांच्या बाजूने लागला. विजयानंतर ईश्वरपूरमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.
या जल्लोषादरम्यान जयंत पाटील आणि त्यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत विजयाचा शड्डू ठोकला. विशेष म्हणजे, जयंत पाटील यांनी आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन विजय साजरा केला, आणि हा क्षणही चर्चेचा विषय ठरला आहे. ईश्वरपूरच्या या निकालाने सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.