ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची – अजित पवार

मुंबई दि. २८ डिसेंबर – आगामी‌ काळात आमदारांनी सभागृहात तारतम्य ठेवून बोलावे…सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची असल्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विधिमंडळात सदस्यांनी संसदीय राजशिष्टाचार व आचारसंहितेचे पालन करावे, यासाठी आज विधीमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सविस्तर भूमिका व्यक्त केली.

सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विधीमंडळातील सर्वच पक्षाच्या आमदारांनी नियमांचे पालन केले पाहिजे, अशा शब्दात अजित पवार यांनी सर्व आमदारांचे कान टोचले. विधीमंडळ सर्वोच्च असून इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या प्रदिर्घ वाटचालीत विधीमंडळ सभागृहाने उच्च मूल्य प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहिजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते असेही अजित पवार म्हणाले.

काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला आहे‌. आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असेही अजित पवार यांनी सदस्यांना सांगितले. ज्यावेळी आम्ही निवडून आलो.‌ त्याकाळात विधीमंडळाचे कामकाज लाईव्ह होत नव्हते. परंतु आता दोन्ही सभागृहाचे कामकाज लाईव्ह होते. राज्य आणि माध्यमे आपल्याकडे पहात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संसदीय शिष्टाचाराचे पालन केले पाहिजे. आमदारांना दोन – दोन लाख मतदार मतदान करुन विधानसभेत पाठवत असतात. त्यांचे प्रतिनिधीत्व आमदाराला करायला हवे‌. कुत्रे, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवावे अशा शब्दात अजित पवार यांनी सर्वांना खडसावले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!