नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही महिन्यापासून हवामान बदलते आहे. देशभरात थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता महाराष्ट्रातील काही भागातही पावसाची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही स्थिती उद्भवली आहे. ढगाळ वातावरणामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उर्वरित भागात थंडी कायम राहिल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिल्ली, हरियाणा, पंजाब, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम येथे अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहे. त्यामुळे वातावरणात मोठा गारवा निर्माण झालाय. पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती राहिल, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत, पश्चिम हिमालयात काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होईल, असेही हवामान खात्याने म्हंटले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. पूर्व आसाममध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.