मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने प्रचंड जोर धरला असून काही ठिकाणी मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. अश्यात जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 8 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. मात्र यानंतर मोसमी पाऊस विश्रांती घेणार आहे. 9 आणि 10 तारखे नंतर राज्यात कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार असा अंदाज आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे, 2 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्टपर्यंत राज्यातील विदर्भ विभागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज आहे. दुसरीकडे मराठवाड्यात देखील या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा विभागात दररोज दुपारी तीन-चार वाजेनंतर पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आणि दररोज या विभागात भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील या कालावधीमध्ये समाधानकारक असा पाऊस पडणार आहे. या विभागातही सरीवर सरी असा पाऊस सुरूच राहणार आहे. 8 ऑगस्टपर्यंत कोकणातही चांगला पाऊस पडणार आहे. कोकणात पावसाची तीव्रता इतर भागांपेक्षा अधिक राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील 2 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, इगतपुरी, नाशिक, मालेगाव या भागात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.