ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आणखी १५ दिवस लागणार : कुरनूर धरणात उजनीचे पाणी येण्यास !

पाण्याचा दाब कमी असल्याने अडचणी

अक्कलकोट : प्रतिनिधी

बहुचर्चित एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे मिळत असलेले उजनी धरणाचे पाणी कुरनूर धरणात पोहोचण्यास आणखी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या सुरुवातीला हे पाणी कुरनूर धरणात येऊन मिसळणार आहे,असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.सध्या उजनीतून १ हजार ५०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्यानंतर पुढे मोहोळमधून साधारण ५०० चा आहे त्यानंतर कारंबामधून ५० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे पुढे हगलूरमधून त्याच दाबाने पाण्याचा प्रवाह सुरू आहे.पाण्याचा दाब कमी आहे आणि वेग देखील कमी आहे त्यामुळे पाणी येण्यास विलंब होत आहे त्यात एकच पंप सुरू असल्याने पुढे पाणी सरकण्यासही वेळ लागत आहे.तांत्रिक अडचणीही त्यामध्ये येत आहेत. मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी रात्रंदिवस यावर लक्ष ठेवून आहेत.सध्या दर्गनहळळी आणि रामपूर तलावामध्ये पाणी सोडण्यात आले आहे.२० डिसेंबरपर्यंत या ठिकाणी पाणी सुरू राहील.त्यानंतर पुढे ते दर्शनाळ खोल खोदाईद्वारे ते पाणी पाच दिवसात हरणा नदीत पोहचणार आहे.

त्यानंतर पुन्हा पुढे १४ किलोमीटरचा प्रवास राहणार आहे त्यानंतर हे पाणी कुरनूर धरणात येणार आहे पाण्याचा वेग हा अत्यल्प असल्याने साधारण पाच ते सात टक्केच पाणी यावर्षी धरणामध्ये वाढू शकते,असा देखील प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.तसे पाहिले तर यावर्षी ही एक प्रकारे चाचणी आहे पुढच्या वर्षी मात्र उजनी धरणात पाणीसाठा भरपूर राहिल्यास या ठिकाणी सलग प्रवाही पध्दतीने जास्त वेगाने धरणात पाणी येऊ शकते.

यावर्षी उजनी धरणातच अत्यल्प पाणीसाठा असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडता येणार नाही ही देखील मोठी अडचण आहे.यावर्षी अडचणी काय येतात हे पाहून पुढील वर्षी त्याची तयारी आणखी जोमाने करण्यात येणार आहे. पहिले वर्ष असल्याने तांत्रिक काही अडचणी यामध्ये निर्माण येऊ शकतात याचाही अभ्यास पाटबंधारे विभाग करत आहे. पुढच्या वर्षी मात्र या सर्व अडचणींवर मात करत सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणार आहे.अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी पाण्याचा विषय सध्या घडीला तरी जीवन मरणाचा बनलेला आहे. गेल्या २७ वर्षांपासून हा पाण्याचा प्रश्न मिटलेला नव्हता.२०२३ अखेर हे पाणी कुरनूर धरणात पोहोचणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांतून सध्या तरी समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!