वडिलांच्या आठवणीत जय पवारांचा वाढदिवस; भावनिक वातावरणात साधेपणाने साजरा !
29 फेब्रुवारीचा दुर्मिळ वाढदिवस यंदा दुःखाच्या छायेत; पत्नी ऋतुजा पवार यांचा भावनिक संदेश चर्चेत
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा वाढदिवस 29 फेब्रुवारी रोजी येत असल्याने तो चार वर्षांतून एकदाच साजरा होणारा विशेष दिवस मानला जातो. दरवेळी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा होणारा हा वाढदिवस यंदा मात्र वेगळ्याच आणि अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने केवळ पवार कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या नेतृत्वाच्या अचानक झालेल्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. अशा कठीण प्रसंगातच जय पवार यांचा वाढदिवस आल्याने कुटुंबीयांसाठी हा दिवस अधिक वेदनादायी ठरला.
याच निमित्ताने जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पवार यांनी सामाजिक माध्यमावर भावनिक संदेश लिहित काही खास छायाचित्रे शेअर केली. या छायाचित्रांमध्ये अजित पवार यांच्यासोबत जय पवार यांचा एकत्रित फोटो तसेच पती-पत्नीचे काही जिव्हाळ्याचे क्षण टिपलेले फोटो समाविष्ट आहेत.
ऋतुजा पवार यांनी आपल्या संदेशात, “हे सगळं अजूनही अविश्वसनीय वाटत आहे,” असे नमूद करत अचानक बदललेल्या परिस्थितीत जय पवार यांनी दाखवलेल्या धैर्याचा आणि मानसिक ताकदीचा अभिमान व्यक्त केला. कठीण प्रसंगात खंबीरपणे उभे राहून कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचा त्यांचा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे त्यांनी लिहिले. त्यांच्या शब्दांतून पतीबद्दलचा अभिमान, वेदना आणि प्रेम स्पष्टपणे जाणवत आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, इतरांच्या गरजांना स्वतःच्या गरजांपेक्षा अधिक महत्त्व देण्याची जय पवार यांची सवय आहे. लोकांच्या अडचणी समजून घेऊन मदतीसाठी सदैव तत्पर राहणे ही त्यांची ओळख आहे. “दादांनी राज्याच्या भल्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी झटताना प्रामाणिकपणा, शौर्य आणि निस्वार्थीपणा यांचा आदर्श जपला. त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न जय करत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. अशा व्यक्तिमत्त्वाचा सहचार लाभल्याचे भाग्य लाभल्याची भावनिक कबुली त्यांनी दिली.
जय पवार यांचा वाढदिवस नेहमीच वेगळ्या पद्धतीने साजरा होतो, कारण 29 फेब्रुवारी ही तारीख चार वर्षांनी एकदाच येते. मात्र यंदा उत्साहाऐवजी आठवणींची छाया अधिक गडद होती. वडिलांच्या आठवणींनी भारावलेल्या वातावरणात कुटुंबीयांनी अत्यंत साधेपणाने हा दिवस साजरा केला. सामाजिक माध्यमांवर अनेकांनी जय पवार यांना शुभेच्छा देत धीर दिला.
अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी एकमेकांना आधार देत ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कठीण काळात ऋतुजा पवार यांनी व्यक्त केलेले शब्द केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा नसून, पतीच्या धैर्याला दिलेली सलामी ठरली आहे. यंदाचा हा वाढदिवस आनंदापेक्षा आठवणींनी आणि भावनांनी अधिक भारलेला ठरला.