अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरला मागील वर्षी ऊस पुरवठा करण्यासाठी सहकार्य केलेल्या वाहतूक व तोडणीदारांची संपूर्ण बिले अदा करण्यात आल्याची माहिती प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली. मागील वर्षी जय हिंद शुगरने ७ लाख ९३ हजार ५०६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते.दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर यापुर्वीच प्रतिटन २७०० रुपये प्रमाणे बिले जमा केली आहेत.पुढच्या गाळप हंगामासाठी कारखाना प्रशासनाकडून तयारी जोमाने सुरू आहे.यापुर्वीच मिल रोलरचे पुजन झाले आहे.
यांत्रिक बाबींची पूर्तता झाली असुन गाळपासाठी कारखाना सज्ज ठेवण्यात आला आहे.गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करारदेखील शासकीय धोरणानुसार चालु करत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान मागील वर्षाची ऊसबिले अदा करण्यास विलंब झाला याबद्दल शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली.आगामी गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पूर्ण विश्वासाने जयहिंद परिवारास ऊस पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी.देशमुख,शेतकी अधिकारी सी.बी.जेऊरे आदी उपस्थित होते.