ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जयहिंद शुगरकडून शेतकऱ्यांचे सर्व ऊसबिल अदा

चेअरमन गणेश माने देशमुख यांची माहिती

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

जयहिंद शुगर कारखान्याने २०२४-२५ हंगामासाठी एफ.आर.पी. प्रमाणे निश्चित असलेल्या २ हजार ४५८ रुपयांच्या दरावरून जाहीर केलेल्या २ हजार ७५० रुपयांनुसार शेतकऱ्यांचे उर्वरित ऊसबिल शनिवारी पूर्णतः अदा केले आहे. यावर्षीच्या नवीन गाळात हंगामाला ही सुरुवात झाली आहे .तसेच ऊस वाहतूक, तोडणी व कामगार यांची देयकेही कारखान्याने पूर्ण दिल्याची माहिती चेअरमन गणेश माने देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चेअरमन माने देशमुख पुढे म्हणाले की, चालू गळीत हंगाम २०२४-२५ हा जयहिंद शुगरसाठी अत्यंत खडतर राहिला. विविध तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे ऊसबिल वितरणात काही प्रमाणात विलंब झाला. मात्र या सर्व काळात शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आणि सहकार्य कारखान्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.शेतकऱ्यांचा विश्वास आम्हाला कायम उभारी देतो. त्यामुळेच हे बिल तातडीने अदा करण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मध्यंतरी जयहिंद शुगरबाबत सोशल मीडियासह विविध स्तरावर काही अफवा पसरविण्यात आल्या होत्या. यावर प्रतिक्रिया देताना माने देशमुख म्हणाले,या सर्व अफवा निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. आमचा कारखाना नियमित आणि शांतपणे सुरू असून कोणताही अडथळा नाही. जयहिंद परिवार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि पुढेही ही परंपरा कायम राहील.

चालू गळीत हंगामाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, या वर्षी कारखान्याने १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत सुमारे ६० हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले असून प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. ऊस तोडणी यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरली असून गळीत यंत्रणा देखील पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा करताना त्यांनी सांगितले की, चालू हंगामातील शेतकऱ्यांचे ऊसबिल नियमितपणे अदा केले जाणार आहेत. शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि ठेकेदार यांनी दाखवलेला विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आम्ही सर्वांचे ऋणी आहोत, असे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेत त्यांनी शेवटी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की, चालू गळीत हंगामात ऊस पुरवठा करून कारखान्याच्या स्थिर आणि सुदृढ कामकाजात सहकार्य करावे.जयहिंद शुगर शेतकरी हितासाठीच अस्तित्वात आहे. एकत्रितपणेच विकासाची वाटचाल अधिक वेगाने होऊ शकते,असा विश्वासही त्यांनी
व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!