ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माढा लोकसभेसाठी जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा कायम असतांना नुकतेच महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असा आग्रह शरद पवार यांनी केला आहे. या संदर्भात महादेव जानकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा झाली. आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून निवडणुकीला अद्याप अवकाश आहे, त्या हिशोबाने आम्ही विचार करत असल्याचे महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाविकास आघाडीतील जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे आमच्यात आता केवळ त्या संबंधी चर्चा झाली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

माढा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ मानला जात आहे. माढा लोकसभेच्या बरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघात देखील धनगर समाजाचे महत्त्वाचे मतदान आहे. या दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाच्या मतदानाचा विचार करता, महादेव जानकर यांच्या माध्यमातून शरद पवार यांनी मोठी राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. महादेव जानकर जर माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, तर तेथील धनगर मतदानाचा फायदा महाविकास आघाडीला होईल. त्याचबरोबर महादेव जानकर सोबत असेल तर बारामती लोकसभा मतदारसंघात देखील धनगर समाजाच्या मतदानाचा फायदा हा खासदार सुप्रिया सुळे यांना होईल, अशी शरद पवार यांना अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा शरद पवार हे प्रयत्न करत आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवार आणि माझ्यात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती महादेव जानकर यांनी माध्यमांना दिली. शरद पवार हे देशाचे जेष्ठ नेते आहेत, त्यामुळे आमची नेहमीच भेट होत असते. आता माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडचे जागा वाटप झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल, तोपर्यंत आम्ही प्रतीक्षा करत असून आता केवळ चर्चा झाली असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!