जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंबलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांत त्यांनी पाण्याचा थेंब देखील घेतला नसल्याने आणि उपचार घेण्यास नकार दिल्याने कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे.
अमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांच्या आरोग्य तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना जरांगेंनी उपचार न घेता माघारी पाठवले. कोणत्याही प्रकारचा उपचार घेणार नसल्याच्या निर्णयावर ते उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही ठाम होते. शनिवारी जरांगे सकाळपासून स्टेजवर झोपूनच होते.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशाने अंबड उपजिल्हा रुग्णालयातून जरांगे यांची तपासणी करण्यासाठी डाॅक्टर आले होते. मात्र, जरांगेंनी तपासणीसाठी नकार दिला व ते माघारी परतले. जरांगे शनिवारी सकाळपासून उपोषणस्थळी झोपूनच होते. तथापि, गोदापट्ट्यातील अनेक मराठा बांधव जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आंतरवालीत येत आहेत.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात थेट मुंबईत धडक दिली होती. मात्र, वाशीवरच त्यांचे आंदोलन थांबवत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला होता. सोबतच पंधरा दिवसांत या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याचं देखील आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यावर देखील या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उगारले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये चौथ्यांदा उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी त्यांच्या याच उपोषणास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळायची. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्याने आंतरवालीमध्ये पुन्हा एकदा गर्दी होतांना पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक जरांगे यांची भेट घेण्यासाठी येत आहे. मात्र, कालपासून त्यांची प्रकृती खालावल्याने ते कोणासोबत ही बोलत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.