मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या गृहमंत्र्याला तडिपार करा, सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार. एकजूट ठेवा, फूट पडू देऊ नका. सगे-सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न करता समाजाशी दगाबाजी करणाऱ्यांना वठणीवर आणा. एकीत फूट पडू देऊ नका, असे आवाहन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी समाज बांधवांना केले.
जळकोट येथील द्वारकामाता मंगल कार्यालयात मंगळवारी मराठा समाज बांधवांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी जळकोट नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, नगरसेवक, मुस्लिम, लिंगायत बांधव आदिवासी समाज बांधव यांच्यातर्फे मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला.
विजांच्या कडकडाटात आणि पावसात जरांगे-पाटील सरकारला इशारा देताना म्हणाले, जातीला बाप न मानणारे पक्षाला जर बाप मानत असतील तर त्यांना बाजूला सारा. बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे होणाऱ्या ९०० एकरवरील सभेसाठी मराठ्यांसह अन्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे राज्याच्या गृहमंत्र्याला तडिपार करा, केसेसला भिऊ नका, मी जेलमध्ये जायची तयारी ठेवली आहे. जेलमध्ये बसून देखील आंदोलन सुरू ठेवेन. आदर्श आचारसंहितेचे पालन करीत आचारसंहितेत सुरू असणारे हे देशातील पहिले आंदोलन आहे. माझ्या घरावर सरकारकडून दररोज एक नोटीस लावली जात आहे. घराला जणू काही स्टाईल बसवले आहेत की काय, अशी अवस्था झाली असल्याची मिश्कील टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी लहान मुलाच्या हस्ते मनोज जरांगे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस तालुक्यातील मराठा बांधवांसह मुस्लिम, लिंगायत व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.