छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारी दुपारी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथील उपोषणस्थळी दाखल झाले. त्यावेळी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, मला जेलमध्ये टाकून संपविण्याचा, मराठ्यांवर दहा टक्के आरक्षण थोपविण्याचा डाव आहे. आपण जेलमध्येही उपोषण करू. परंतु ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही. मराठा आमदार, मंत्र्यांना सगेसोयऱ्यावर बोला म्हणून सांगितलं. परंतु ते नेत्याला, पक्षाला मोठं करण्यासाठी त्यांनी माझी एसआयटी चौकशी करा, अशी मागणी केली. मराठा समाज त्या आमदार, मंत्र्यांच्या आरक्षण भूमिकेकडे लक्ष ठेवत आहे. आरक्षणासाठी ना सत्ताधारी, ना विरोधकांकडे जाण्याची गरज आहे. समाजात मोठी शक्ती आहे. त्यामुळे त्यांना समाजाकडे यावे लागेल, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.