मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे. अंतरवाली सराटी गावात जाऊन आम्ही बैठक घेऊ तसेच आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
सध्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जालन्याच्या भांबेरी गावातून अंतरवाली सराटीकडे निघाला आहे. आज म्हणजेच सोमवारी दुपारी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, संचाबंदी उठवा मुंबईत येऊन दाखवतोच असं आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील भांबेरी गावातून माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, “आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारने ठिकठिकाणी ५ ते १० हजार पोलिसांचा बंदोबस्त उभा केला आहे. ते आम्हाला मुंबईत जाऊ देणार नाहीत” “मी मुंबईत जाण्याचा प्रयत्न केला, तर मराठा आंदोलकांना त्रास होईल. मी कोणत्याही मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे पोरांना त्रास होईल, असं मी वागणार नाही. आम्ही अंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवू”, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन देखील जरांगे यांनी केलं आहे.दरम्यान, सागर बंगला सरकारी असून तिथे कुणीही येऊ शकतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना “मला सागर बंगल्यावर बोलावून फडणवीसांनी मोठी चूक केली आहे”, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. संचाबंदी उठवा मुंबईमध्ये येऊन दाखवतोच, असं आव्हान जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
.