मुंबई वृत्तसंस्था : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, येत्या १५ तारखेला राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक वातावरण तापले असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महापालिका निवडणुकांबाबत थेट आपली भूमिका जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बुलढाणा येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठं आवाहन केलं. “जे नेते आणि पक्ष मराठा समाजाच्या विरोधात गेले, आरक्षणाच्या विरोधात उभे राहिले, तेच लोक आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशा लोकांना मतदान करू नका,” असा थेट संदेश त्यांनी दिला.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने आता अधिक कट्टर आणि कडवट भूमिका घेतली पाहिजे. “या सरकारने मुस्लिम, दलित समाजाला काडीला लावले. त्यामुळे या सरकारचा कार्यक्रम करा, इतकी खुन्नस ठेवा की यांना मतदानच करायचं नाही. लोकसभेला आम्ही कसं वातावरण तयार केलं होतं, ते सगळ्यांनी पाहिलं आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
निवडणुकांमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप करताना त्यांनी सत्ताधारी नेत्यांवरही गंभीर आरोप केले. “निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप होत नाही, तर यांनी पैसे वाटलेच आहेत. यांच्याकडे आधी काहीच नव्हतं, आता मात्र नोटांचे बंडल शर्टातून दिसतील इतके पैसे आहेत. नोटा वाटतात आणि घोळ घालतात,” असा घणाघात त्यांनी केला.
राज्यातील राजकीय युतींवरही त्यांनी टीका केली. “कधी राष्ट्रवादीसोबत, कधी भाजप-शिवसेनेसह, तर कधी काँग्रेससोबत यांची युती होते. म्हणजे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळेच एकत्र आले आहेत. मग यांचे शत्रू कोण? आम्हीच ना, गोरगरीब जनता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“आपल्या पक्षाचा नेता निवडून यावा यासाठी कुणासोबतही युती करा, हाच यांचा अजेंडा आहे. लोकांना पर्यायच दिले जात नाहीत. एकदा लोकांना पर्याय मिळू द्या, मग जनता कशी उलटापालट करते ते पाहा,” असेही जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा निवडणुकांत ते थेट उतरत नाहीत. “आपल्याला टप्पू मासा लागतो. त्याला जर माज असेल, तर तो माज उतरवलाच समजा,” असे सूचक विधान करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला नवी दिशा मिळाली असून, त्यांच्या आवाहनाचा मतदारांवर किती परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.