मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. जयंत पाटील हे सराईत दरोडेखोर आहेत. ते दरोडा टाकून आपल्या मागे कोणताही पुरावा ठेवत नाहीत. परदेशात शिक्षण घेतल्यामुळे त्यांनी फॉरेन रिटर्न असे वातावरण तयार केले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा सहकारी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहारावरून जयंत पाटील यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ते म्हणाले, सांगली जिल्हा सहकारी बँकेची पूर्वीपासूनच चौकशी सुरू आहे. सहकारी अधिनियम 1960 चे कलम 83 अंतर्गत या प्रकरणी 22 मुद्यांवर चौकशी झाली आहे. त्याच्या चौकशी अहवालात जिल्हा बँकेवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी संचालक मंडळावर कारवाई करून बँकेवर प्रशासन नेमण्यात यावा. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयंत पाटील यांची सुरू असलेली मनमानी संपुष्टात आणण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
जयंत पाटील या बँकेचे सर्वेसर्वा आहेत. ते सर्वकाही करतात. पण आपल्या त्याच्याशी काही संबंध नाही असे ते दाखवतात. ते एकाद्या सराईत दरोडेखोरालाही लाजवतील. काही लोक आपल्याकडे चोऱ्यामाऱ्या करायला येतात. ते आपल्या कृत्याचे कोणतेही पुरावे ठेवत नाहीत. जयंत पाटील हे त्यापैकी एक आहेत. ते ही आपल्या मागे कोणता पुरावा ठेवत नाहीत.
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, जयंत पाटील हे केवळ गोड गोड बोलतात. दिसायला स्मार्ट आहेत. परदेशात शिकून आलेत. त्यामुळे त्यांनी फॉरेन रिटर्न असे वातावरण तयार केले आहे. त्यांच्या तोंडातून साखर पडते की काय? असे ते बोलतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. सांगली जिल्हा सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराचे मूळ हे जयंत पाटील आहेत. ते इकडे अंधारात भाजपच्या पाया पडत फिरत असतात.