ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जीपची कंटेनरला जबर धडक : बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

मंगळवेढा : वृत्तसंस्था

नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर आंधळगाव नजिक रांजण स्टॉप येथील ब्रिजवरील रोडवर उभा असलेल्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्स जीपने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रकांत श्रीमंत कुंभार व संगीता चौडाप्पा कुंभार (रा.घत्तरगा, ता. अफजलपूर, जि.कलबुर्गी) हे दोघे बहिण-भाऊ या अपघातात जागीच मयत झाले तर ट्रॅक्स जीपचा चालक मेहबूब दावलसाब मणियार (रा. अफजलपूर), शंकर चौडाप्पा कुंभार (वय ४), श्रावणी चौडाप्पा कुंभार (वय ५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील मयत संगीता कुंभार आणि चंद्रकांत कुंभार हे दोघे बहिण-भाऊ असून संगीता ही कराड येथे गेल्या एक वर्षापासून कामानिमित्त गेली होती. ती गावाकडे येणार असल्याने तिचा भाऊ चंद्रकांत हा ट्रॅक्स गाडी घेवून तिच्या घरच्या साहित्यासह व लहान मुलांसह दि.२७ फेब्रुवारी रोजी कराडवरून सोलापूरच्या दिशेने अक्कलकोटकडे जाण्यास निघाला होता. आंधळगाव पासून सांगोल्याच्या दिशेने तीन कि.मी. अंतरावर रांजण स्टॉप येथील राष्ट्रीय महामार्गाच्या ब्रिजवर मोठा ट्रेलर (क्र. जीजे १८ बी टी ८७८२) बंद पडला होता. पहाटे ४ च्या सुमारास सोलापूरकडे जाणाऱ्या त्या ट्रॅक्सने (क्र.केए २७ बी ६१८८) कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ट्रॅक्समधील संगीता व चंद्रकांत हे दोघे भाऊ बहीण जागीच ठार झाले तर यातील ट्रॅक्स चालक व संगीताची दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच नागरिक, पोलीस व राष्ट्रीय महामार्गाचे पथक दाखल होत अपघातातील मयत व जखमींना बाहेर काढले. उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय तेथून सोलापूर येथे नेण्यात आले. या घटनेची फिर्याद चौडाप्पा कुंभार यांनी दिली असून ट्रेलर चालक जबाबदार असल्याचे सांगत त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून मंगळवेढा पोलिसांनी कंटेनर चालक इंद्रजीतकुमार कृष्णा सिंग (रा. मंझौली बिघा, ता. बाढ, जि. पटना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!