अक्कलकोट, दि.१० : केंद्रातील मोदी सरकारने सत्तेचा दुरूपयोग करत सातत्याने शेतकऱ्यांवर जुलूम चालवले आहेत. महागाई व जनविरोधी कायद्यांमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत भाजपच्या मंत्र्यांचा मुलगा ज्या पध्दतीने शेतकऱ्यांना चिरडून ठार करतो, ही बाब भविष्यासाठी घातक ठरणार असून वेळीच या सरकारला जाग यावी यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अक्कलकोट तालुक्यातील जनतेने प्रतिसाद देण्याचे आवाहन माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले. महाविकास आघाडीने उद्या ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार, स्वाभिमानी व इतर मित्रपक्षाच्यावतीने आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी सकाळी आठ वाजता निषेध मोर्चा निघणार आहे. त्यानंतर निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर खुप मोठा अन्याय होत आहे. हा अन्याय महाविकासआघाडी सहन करणार नाही. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय देशमुख म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. पण केंद्रातील सरकारमुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्राची ही मुस्कटदाबी आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. चुकीचे निर्णय हाणून पाडू. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनीही केंद्राच्या भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. केंद्रातील सरकार हे तालिबानापेक्षाही पलीकडे गेले आहे. त्यांना शेतकरी कधीही माफ करणार नाहीत. शेतकरी उध्वस्त करण्याचे पाप भाजप सरकार करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
या बंद मध्ये सर्व व्यापारी, रिक्षा चालक, वाहन चालक संघटना, आडत व्यापारी, बस वाहतूक सोमवार बाजार बंद राहणार आहे. हा बंद कडकडीत पाळण्याचा निर्धार उपस्थित सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्याला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने या बैठकीत करण्यात आले.दुधनी बाजार समिती ,मैंदर्गी आणि अक्कलकोट येथील सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे,पंचायत समितीचे सभापती आनंद सोनकांबळे,उपसभापती प्रकाश हिप्परगी,जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जून पाटील,जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगल पाटील, वैशाली चव्हाण, सुनिता हडलगी, माया जाधव, शिवराज स्वामी, सिध्दार्थ गायकवाड, कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे, सिध्दु भंडारकवठे, विश्वनाथ हडलगी,मुबारक कोरबू,शोएब पटेल, शाकीर पटेल, प्रहारचे राजू चव्हाण, विलास गव्हाणे, योगेश पवार, अश्पाक अगसापूरे, बाबासाहेब पाटील, नगरसेवक सद्दाम शेरीकर, संजय इंगळे, असद पिरजादे आदी उपस्थित होते.
व्यापारी महासंघाचा बंदला पाठिंबा
महाविकास आघाडीच्या बैठकीला व्यापारी महासंघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.या बैठकीत सर्व व्यापाऱ्यांना बंद बाबत नेते मंडळींनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर व्यापारी संघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी बंदला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.यावेळी अक्कलकोट शहरातील व्यापारी उपस्थित होते.