पत्रकार नारायण चव्हाण यांनी सामाजिक सेवेचा वसा पुढे चालू ठेवावा : पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने; सेवानिवृत्तीनिमित्त सोलापूरात मान्यवरांच्या हस्ते झाला गौरव
सोलापूर,दि.७ : आजची नवीन पिढी मोबाईलच्या मागे लागली असून त्याच्या अतिवापराने डोळ्यांचे मायनस नंबर वाढत आहेत.लहान मुलांमध्ये तिरळेपणाचा आजार जडत असून मोबाईलचा अतिरेक टाळून त्याचा गरजे इतकाच वापर करावा, असा मौलिक सल्ला जागतिक नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी दिला आहे.
रविवारी, डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात कुमठे प्रशालेतील शिक्षक तथा जेष्ठ पत्रकार नारायण चव्हाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव समितीच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात डॉ. लहाने बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख होते. डॉ. लहाने यांच्या हस्ते नारायण चव्हाण व त्यांच्या पत्नी अनिता चव्हाण यांचा शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ आणि विठ्ठल मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मंचावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्कराज काडादी, ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने, जय हिंद शुगरचे अध्यक्ष गणेश माने देशमुख, जकराया साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, मंद्रूपचे तहसीलदार राजशेखर लिंबारे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला आदींची उपस्थिती होती.प्रारंभी विद्यार्थिनी श्रद्धा लंगोटे हिने स्वागत गीत सादर केले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि डॉ. शिवरत्न शेटे यांचा संदेश यावेळी ऐकवण्यात आला.
पुढे बोलताना डॉ. लहाने म्हणाले, मोबाईल वापरामुळे पुस्तक संस्कृती संपत चालली असून गुगलवर अवलंबून राहण्यामुळे बुद्धिमत्तेचा कस कमी होत आहे.त्यामुळे वाचन चळवळ वाढविले पाहिजे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी गरिबांची काळजी घ्यावी असे सांगून त्यांनी आरोग्याच्या काही मौलिक सूचना केल्या तसेच त्यांनी आपल्या मनोगतात चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करीत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक सेवेचा वसा पुढे चालू ठेवावा, असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना चव्हाण म्हणाले. माजी आमदार ब्रह्मदेव माने, डॉ.तात्याराव लहाने आणि पत्रकारिता यातून आपल्या जीवनाला कलाटणी मिळाली. शिक्षक म्हणून काम करताना पत्रमहर्षी रंगाआण्णा वैद्य यांनी पत्रकारितेची संधी दिली. त्यामुळे शैक्षणिक व पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करता आली.
यावेळी आमदार देशमुख, कल्याणशेट्टी, माजी मंत्री म्हेत्रे, धनंजय माने, तहसीलदार लिंबारे, प्रा. डॉ.भीमाशंकर बिराजदार, शेळके आदींनी मनोगत व्यक्त केले.गौरव समितीचे दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. किशोर थोरे यांनी आभार मानले. यावेळी सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.