सोलापूर : प्रतिनिधी
दिवाळीची राज्यभरात धामधूम सुरु असल्याने अनेक ग्राहक बाजारात सोने खरेदी करण्यासाठी येत होते याच वेळी शहरातील एका परिसरात असलेल्या कल्याण ज्वेलर्समधून ८ नोव्हेंबर रोजी हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या बुरखाधारी महिलेचा छडा गुन्हे शाखेने लावला असून, या प्रकरणात एका महिलेस अशोक चौकातून अटक केली आहे. तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी एक महिला व पुरुषाचा शोध चालू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण ज्वेलर्समध्ये दागिने खरेदीसाठी सायकांळी ४ च्या सुमारास दोन बुरखाधारी महीला आल्या होत्या. तेथे त्यांनी सेल्समनची नजर चुकवून सोन्याच्या दोन बांगड्या चोरून नेल्या. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स.पो.नि विजय पाटील, पो. उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकाने घटनास्थळापासून सुमारे ८० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन आरोपीचा शोध घेत होते. १८ नोव्हेबर रोजी प. उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना एक बुरखाधारी महीला चोरीचे सोने घेवून अशोक चौक परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार अशोक चौक परिसरात सापळा लावून सदर महीलेस ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता तिच्या ताब्यात कल्याण ज्वेलर्स येथून चोरलेले ३१.५० ग्रॅम वजनाचे १ लाख ८९ हजार ५२०रूपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले. तिचे नाव नाजिया आसिफ शेख (वय ३८, रा. महालक्ष्मी नगर, नई जिंदगी, सोलापूर) असे असून आई मुमताज नजिर शेख (वय ५८, रा. समाधान नगर, सोलापूर) या दोघींनी मिळून चोरी केल्याची कबुली तिने दिली. हा गुन्हा करतेवेळी तिचा भाऊ अब्बास नजिर शेख (वय ४०, रा. समाधान नगर, सोलापूर) हा कल्याण ज्वेलर्सच्या बाहेर पाळत ठेवून उभा असल्याचे तिने सांगितले. आरोपी नाजिया शेख हिला पुढील कारवाईकरीता सदरबझार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील अन्य आरोपी मुमताज शेख व अब्बास नजीर शेख यांचा शोध सुरू आहे.