ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कल्याणशेट्टी महाविद्यालयाचे समाज सेवाकार्यात उल्लेखनीय योगदान

वागदरी येथील श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : शिबिरार्थी व ग्रामस्थांना देशप्रेम, समाजसेवा कर्तव्य आणि जबाबदारी यांची जाणीव करून देण्यात कल्याणशेट्टी महाविद्यालय यशस्वी झाले असून देशभक्ती वृद्धिंगत करण्यात महाविद्यालयाचे योगदान मोठे आहे,असे गौरवोद्गार वागदरी येथील विरक्त मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी
यांनी व्यक्त केले.

वागदरी येथे कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले होते. शिबिर समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर सरपंच शिवानंद घोळसगांव, माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी, गोगावचे माजी सरपंच प्रदीपजी जगताप,बसवराज शेळके, शरणबसप्पा मंगाणे, कमलाकर सोनकांबळे, प्रदीप पाटील,सुनिल सावंत, श्याम बाबर,असलम मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य शारदा रोट्टे,जयश्री बटगेरी, कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार उपस्थित होते.

पुढे महास्वामीजी म्हणाले की, एनएसएस श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता, महिला संघटन आदी समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात आले, त्यामुळे मी नाही तर आम्ही या ब्रीदवाक्याची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत साकारली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले,प्रणाली थोरात व पंचप्पा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचलन समर्थ पवार व बापूजी चव्हाण यांनी केले. आभार कार्यक्रमाधिकारी प्रा शितल झिंगाडे-भस्मे यांनी मानले.

शिबिरार्थी शाश्वत विकास अभियानात यशस्वी कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वागदरी गावाचा परिसर स्वच्छ केला, समाजसेवेचा आदर्श घालून दिला, त्यामुळे शाश्वत विकासासाठी युवक हे अभियान यशस्वी झाले आहे असे यावेळी सरपंच शिवानंद घोळसगाव यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!