अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट नगरपरिषदेतील सुमारे सव्वा दोनशे सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी किट वाटप करण्यात आले. हा उपक्रम आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.
या कार्यक्रमात कल्याणशेट्टी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की,नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी हे शहर विकासाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यामुळेच नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी वातावरणात राहता येते. स्वच्छतेसाठी हे कर्मचारी जे परिश्रम घेतात, ते खरोखर प्रशंसनीय आहेत.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कल्याणशेट्टी परिवाराने शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त किट वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. किटमध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू आणि आवश्यक साहित्याचा समावेश होता.
कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, माजी अध्यक्ष शिवशरण जोजन, बबलू कामनुरकर, बंटी राठोड, मल्लिनाथ आळगी, अभि लोकापुरे, केदार माळशेट्टी, धनराज कांबळे, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील म्हणाले, कल्याणशेट्टी परिवार हे फक्त राजकारणातच नाही, तर सामाजिक कार्यातही अग्रस्थानी आहेत. शहरातील प्रत्येक घटकाबद्दल त्यांना आपुलकी आहे. सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी किट देऊन त्यांनी समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे. त्यांची ही परंपरा प्रेरणादायी आहे.
कल्याणशेट्टी परिवाराने अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांसोबत घट्ट नाते जोडले असून प्रत्येक सणानिमित्त सामाजिक उपक्रमांद्वारे आनंद वाटण्याचा प्रयत्न केला आहे. मिलन कल्याणशेट्टी नगरसेवक झाल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त किटचे वाटप करतात. त्यांच्या या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते.
या उपक्रमामुळे शहरातील सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली असून, कल्याणशेट्टी परिवाराबद्दल कृतज्ञतेची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.आमच्यासारख्या कामगारांना दिलेला सन्मान म्हणजे खरी दिवाळीची गोड भेट आहे,असे एका कर्मचाऱ्याने आनंदाने सांगितले.