मुंबई वृत्तसंस्था : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजय मिळवला असून, गेली २५ वर्षे सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला पहिल्यांदाच ढासळला आहे. या निकालामुळे मुंबईत सत्ता परिवर्तन घडले असून, आता भाजपचा महापौर होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेची भाजपला साथ लाभणार आहे.
या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर राज्यभरातून प्रतिक्रियांचा पूर आला आहे. त्यातच सिनेअभिनेत्री व खासदार कंगना राणौत हिची जळजळीत प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेने कंगनाच्या घरावर केलेल्या कारवाईचा संदर्भ देत तिने हा निकाल म्हणजे “न्याय मिळाल्याचा क्षण” असल्याचे म्हटले आहे.
भाजपविरोधात एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून, दोन्ही पक्ष मिळून केवळ सुमारे ७५ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. यावर प्रतिक्रिया देताना कंगना राणौत हिने म्हटले की, “ज्यांनी माझं घर तोडलं, मला धमक्या दिल्या, शिवीगाळ केली, ते आज सत्तेतून बाहेर फेकले गेले आहेत. महाराष्ट्राने त्यांना नाकारले आहे.”
कंगनाने भाजपच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. “महिलांचा द्वेष करणारे, धमक्या देणारे आणि माफिया प्रवृत्तीचे लोक आज जनतेने सत्तेबाहेर फेकले आहेत,” अशी तीव्र टीकाही तिने केली.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी कंगनाच्या घरावरील कारवाई द्वेषपूर्ण असल्याचे नमूद केले होते. त्या घटनेची आठवण काढत कंगनाने हा निकाल म्हणजे स्वतःसाठी आणि लोकशाहीसाठी न्यायाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली आहे. मुंबईतील या निकालामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.