ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे डॉ. उमा कुलकर्णी यांना कायकरत्न तर डॉ. संध्या राजन यांना काव्यरत्न पुरस्कार

कलबुरगी प्रतिनिधी : कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून डॉ. राजेंद्र पडतुरे प्रायोजित मराठी भाषा “कायकरत्न” पुरस्कार यंदा बेळगावच्या कन्या पुणे येथील ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉ.उमा कुलकर्णी यांना तर स्व. डॉ. वैजनाथ शेगेदार यांचे स्मरणार्थ दिला जाणारा मराठी भाषा काव्यरत्न पुरस्कार ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. संध्या राजन अणवेकर यांना देण्यात येणार आहे. याच संस्थेतर्फे दिला जाणारा कल्याणरत्न पुरस्काराची घोषणा अपरिहार्य कारणास्तव जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे.

बेंगळूरू येथील महाराष्ट्र मंडळ सभागृहात रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित मराठी भाषा दिन कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरय्या स्वामी यांनी दिली. डॉ. उमा कुलकर्णी या उत्तम अनुवादक म्हणून मराठी साहित्याची सेवा करीत आहेत.कन्नड भाषेतील नामवंत साहित्यिक डॉ.शिवराम कारंत, डॉ.एस. एल. भैरप्पा, पूर्णचंद्र तेजश्वी, सुधा मूर्ती, चंद्रशेखर कंबार, गिरीश कर्नाड, डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांच्यासह अनेक लेखकांचे एकूण ६२ पेक्षा जास्त पुस्तके मराठी भाषेत अनुवादीत केल्या आहेत.त्यांना महाराष्ट्र व कर्नाटकातून अनेक पुरस्कारही मिळाल्या आहेत.

मराठी भाषा काव्यरत्न पुरस्कार बेंगळूरू येथील ज्येष्ठ मराठी साहित्यिक कवयित्री डॉ. संध्या राजन अणवेकर यांना जाहीर झाला आहे. डॉ. संध्या राजन यांचे अनेक मराठी साहित्य प्रकाशित झाले असून अलीकडेच त्यांनी नांदेडचे नामवंत कवी प्रा. देविदास फुलारी यांचे रात्र भरात आहे या पुस्तकाचे कन्नडमध्ये “इरुळू अरळीदे” पुस्तक अनुवादीत करून प्रकाशित केले आहेत. कर्नाटकात मागील तीस वर्षांपासून मराठी साहित्य सेवा करीत असून बेळगावच्या सरकारी विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात कौशल्य अभिवृद्धी विभागप्रमुख-निर्देशक म्हणून कार्यरत आहेत.आतापर्यंत त्यांची एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत‘काजव्यांची दिंडी (कविता संग्रह),’नातिचरामी’ ‘चांदवा’, ‘तुला शोधताना’, ‘मी तुझी मीरा’ ‘मनाचा कवडसा’ ‘सातरंगी कमान’, ⁠ ‘गारवा’ असे एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाले आहेत.प्रतिभावंत कवी लेखिका म्हणून महाराष्ट्र कर्नाटकात प्रसिद्ध आहेत.

करामसाप पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी सरकार्यवाह प्रा. विजयकुमार चौधरी,उपाध्यक्ष बी. ए. कांबळे, कार्यवाह प्रभाकर सलगरे, कोषाध्यक्ष मिलिंद उमाळकर, प्रमोद शहा, नरसिंग मराठे, नरसिंग पाटील, प्रा हणमंत बिराजदार, डॉ.नारायण रोळेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!