रायगड वृत्तसंस्था : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोलीत आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मंगेश काळोखे यांची अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आज सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले होते. मुलाला शाळेत सोडल्यानंतर ते दुचाकीवरून घरी परतत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना गाठले. काळ्या रंगाच्या संशयास्पद चारचाकी वाहनातून आलेल्या ३ ते ४ अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवून तीक्ष्ण हत्यारांनी त्यांच्यावर सपासप वार केले.
हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश काळोखे रस्त्यावर कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्ल्यानंतर आरोपी वाहनासह घटनास्थळावरून फरार झाले.
खोपोली नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मानसी काळोखे विजयी झाल्यानंतर काळोखे कुटुंबाचा राजकीय प्रभाव वाढला होता. त्यामुळे निवडणूक निकालाचा राग, जुन्या वादातून किंवा सुपारी देऊन हा हल्ला करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे. परिस्थिती लक्षात घेता खोपोली शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.
दरम्यान, संशयास्पद काळ्या वाहनाचा शोध घेण्यासाठी जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. “काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल,” असा विश्वास रायगड पोलिसांनी व्यक्त केला आहे.