पुणे वृत्तसंस्था : “माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला, पण तो सिद्ध झाला का?” असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोप करणाऱ्यांनाच टोला लगावला. “ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांच्यासोबतच मी आज सत्तेत बसलो आहे,” असे सांगत त्यांनी भाजपवर सूचक टीका केली. पुण्यात भाजपने कोट्यवधींच्या ठेवी मोडल्या, हा देखील भ्रष्टाचारच असल्याचा आरोप करत अजित पवारांनी स्थानिक भाजप आमदार आणि नेत्यांवर निशाणा साधला. या वक्तव्यानंतर भाजप आणि अजित पवार यांच्यात राजकीय शिलगली रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील एनडीए सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या विकासकामांचा आढावा घेतला. “गतिमान सरकार कसं असावं याचं उदाहरण आम्ही सेट करत आहोत. कोरोनामुळे निवडणुका लांबल्या, पण आता त्या होत आहेत. गेल्या अनेक वर्षांत पुण्यात पायाभूत सुविधांना गती देण्यात आली आहे. कोट्यवधींची गुंतवणूक शहराच्या विकासासाठी करण्यात आली आहे,” असे चव्हाण म्हणाले.
पुणे महापालिकेतील मेट्रो प्रकल्पावर बोलताना चव्हाण यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. “महापालिकेत मेट्रोचा ठराव होऊनही केंद्र आणि राज्यात सत्ता असताना महाविकास आघाडीला मेट्रो सुरू करता आली नाही. त्यांना करायचंच नव्हतं,” असा आरोप त्यांनी केला. मोदी सरकार आल्यानंतर मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली असून सध्या ३३ किलोमीटरचे मेट्रो जाळे कार्यान्वित झाले आहे. आगामी काळात संपूर्ण पुणे शहरात मेट्रोचे जाळे पसरवले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच इलेक्ट्रिक बस, वाहतूक कोंडीवर उपाय आणि शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अजित पवारांच्या ७० हजार कोटींच्या आरोपांवरील विधानावर विचारले असता रवींद्र चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “खुद के गिरेबान में झाँक के देखिए. आम्ही बोलायला लागलो तर अजितदादांना अडचण होईल,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच “तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये काम करत आहात, हे नाकारता येईल का?” असा सवालही त्यांनी अजित पवारांना केला.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.