नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रतिद्वंद्वी अमेरिका व दक्षिण कोरियाने आपल्या विरोधात चिथावणीखोर कारवाई केली तर क्षणाचाही विलंब न करता त्यांना नष्ट करा, असे आदेश उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी सोमवारी आपल्या लष्कराला दिले. राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सर्वात धोकादायक शस्त्रे हल्ले करण्यासाठी सज्ज ठेवण्याचा सल्ला त्यांनी सैन्याला दिला आहे. याच वेळी अमेरिकेसोबत संघर्षाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा भक्कम करण्याचा संकल्प किम यांनी सोडला आहे.
उत्तर कोरियाच्या लष्करातील कमांडिंग अधिकाऱ्यांसोबत झालेल्या पाचदिवसीय बैठकीला किम जोंग उन यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, अमेरिका व दक्षिण कोरियाच्या आमच्या विरोधात कारवाया वाढल्या आहेत. हे दोन्ही देश संयुक्तपणे आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. यदाकदा त्यांनी आमच्याविरोधात चिथावणीखोर कारवाई केली तर सैन्य दलाने न डगमगता सर्व प्रमुख साधनसामग्री एकत्र करून अमेरिका व दक्षिण कोरियाचे नामोनिशाण मिटवण्याची तयारी ठेवावी. या देशांना तसा दणका देण्याची गरज आहे, असे आदेश किम जोंग उन यांनी दिले. याबाबत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीएनए) सविस्तर वृत्त दिले आहे. अमेरिका व दक्षिण कोरियाने युद्धाभ्यास केल्यानंतर अलीकडच्या काळात किम जोंग यांनी दोन्ही देशांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात अमेरिकेवर कुटनितक दबाव वाढवण्याचा किम यांचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेत आगामी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी यंदा शस्त्र परीक्षण वाढवण्याचा किम जोंग उन यांचा इरादा आहे. तीन गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करणे, नवी अण्वस्त्रे बनवणे, आधुनिक हल्ला करणारे ड्रोन तयार करण्याची घोषणा जोंग यांनी याआधीच केली आहे.