सोलापूर : रात्री उशिरा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना जागरण करावे लागते व त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. रात्री उशीरा होणारा पाणीपुरवठा त्वरित बंद करा व दिवसा वेळेवर, पुरेशा दाबाने स्वच्छ पाणीपुरवठा करा अशी मागणी नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे केली.
आज पहाटे दोन वाजेपर्यंत प्रभाग १९ मधील काही भागात पाणीपुरवठा सुरु होता, म्हणून सकाळी धुत्तरगांवकर यांनी महापौरांना निवेदन देत ही मागणी केली. या निवेदनात म्हटले आहे की, प्रभागात मोठ्या प्रमाणावर कामगार वसाहती आहेत. कष्टकरी गरीब कामगार वर्ग दिवसभर मोलमजुरी करुन थकलेला असतो, रात्री पुरेशी झोप होणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. मात्र रात्री उशीरा पाणीपुरवठा केल्याने नागरिकांना पाणी भरण्यासाठी रात्री जागरण करावे लागते. शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा सुरु झालेला पाणीपुरवठा शनिवारी पहाटे दोन वाजेपर्यंत चालू होता. अशाप्रकारे रात्रभर जागरण झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दिवसा कामावर असाताना झोप न आवरल्याने अपघात होण्याची शक्यता बळावते.
तरी या बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करुन तत्काळ रात्रीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश पारीत करावा अशी मागणी गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी तुकाराम चाबुकस्वार, दत्तात्रय सनके व शिवा कांबळे आदी प्रभागातील कार्यकर्ते सोबत होतो.