ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराच्या पोटात चाकू भोसकला

मुंबई वृत्तसंस्था : मुंबईत सध्या महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदानाचा दिवस जवळ येताच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सर्वच पक्ष रात्रंदिवस एक करून प्रचार करत असून, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी पूर्ण ताकद लावत “मुंबईत महायुतीचाच विजय” मिळवण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या रणधुमाळीत एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारावर थेट प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर मुंबईतील बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात प्रचार करत असताना अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला. आरोपीने कुरेशी यांच्या पोटात धारदार चाकू भोसकला. या हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या हाजी सालीन कुरेशी यांना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मुंबईतील निवडणूक प्रचाराच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही प्रचारादरम्यान हल्ल्यांच्या काही घटना समोर आल्या असल्याने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अशीच एक हिंसक घटना छत्रपती संभाजीनगरातही घडली आहे. येथे माजी खासदार आणि एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील प्रचारासाठी गेले असताना त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे, हा हल्ला एमआयएम पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा आहे. या घटनेत जलील यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचेही सांगितले जात असून, त्यासंदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. घटनेनंतर इम्तियाज जलील तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते.

एकीकडे आचारसंहिता लागू असताना आणि दुसरीकडे मतदानाच्या तोंडावर प्रचार अधिक आक्रमक होत असताना, अशा हिंसक घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या शांततेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रचारात वाढत चाललेली हिंसा रोखण्यासाठी प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून कठोर उपाययोजना केल्या जाण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!