ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोफत शिक्षणासह.. कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी आश्वासनं

कोल्हापूर वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून  नेते मंडळी प्रचाराला लागली आहेत. आज कोल्हापुरात शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली.यावेळी त्यांनी  मोठी 5 आश्वासने दिली.

 

महत्वाची आश्वासने

 

1. आमचे सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता पुन्हा आमची सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाहीत. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

2. राज्यातील शेतकऱ्यांना मविआची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल. आमचे सरकार पडले नसते तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. पण आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

 

3. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्या ठिकाणी धारावीकरांना उद्योग धंद्यासकट घरे देऊ. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना सांगितले. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबईवर तुमचा हक्क आहे. आगामी काळात मविआची सत्ता आल्यास आम्ही धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन घेऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

 

4. पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल.

 

5. राज्यातील विद्यार्थिनींना सरकारकडून मोफत शिक्षण दिले जाते. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुलगा आणि मुलगी दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

 

 

 ठाकरेंची विरोधकांवर टीका 

 

जे अडीच वर्षे भोगत आलो ते आज मांडायला आलो आहे. या सरकारने जिथे मिळेल तिथे खायला यांनी सुरुवात केली आहे. प्रकल्पाच्या नावाखाली कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम हे सरकार करत आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण दिसते. 1500 रुपये देऊन कुणाचे घर चालते हे सांगावं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

 

अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मी काय चूक केली हे मला सांगा. सगळी कामे करून देखील आमचे सरकार पाडले. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचं वाकडं करू देत नव्हतो म्हणून त्यांनी सरकार पाडलं. महाराष्ट्र लुटून त्यांना गुजरातला न्यायचा होता म्हणून त्यांनी सरकार पाडले, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. माझी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना विनंती आहे की, पुढील 15 दिवस त्यांनी देशभरातील नेत्यांना घेऊन महाराष्ट्रात राहावे. पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा निघून जावे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!