कुंभारी अश्विनी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर करजखेडे यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार, ३३ वर्षाच्या आरोग्य सेवेबद्दल मी समाधानी, सत्कारानंतर दिली प्रतिक्रिया
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२९ : कुंभारी अश्विनी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर करजखेडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रुग्णालय प्रशासन तसेच विविध विभागाच्या प्रमुखांकडून त्यांचा सेवेबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ.सिद्धेश्वर करजखेडे यांनी आपल्या ३३ वर्षांच्या आरोग्य सेवेतील अनेक आठवणींना उजाळा देत प्रत्येकानीं नियमित व्यायाम करून आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन पहिल्यांदा आपली तब्येत सांभाळा ,असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. यावेळी मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.सुहास कुलकर्णी, सौ. कुलकर्णी ,माजी अधिष्ठाता डॉ. माधवी रायते, उपअधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे ,मेडिकल सुप्रीडेंट डॉ. गुणवंत नस्के यांनी शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय अश्विनी ग्रामीण रुग्णालय तसेच मेडिकल कॉलेजचे प्रमुख विश्वस्त मेहुल पटेल, योगेश पटेल, डॉ.सौ.घटोडे, डॉ. सागर म्हेत्रे, डॉ. कय्युम शेख यांच्यासह डॉ.अक्षय दुधनाळे, डॉ.विरेश बोराडे ,डॉ.संजय नरगीडे,मन्मथ भोगडे आदी मान्यवरांनी त्यांच्या आरोग्यसेवेचे कौतुक करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अंजली राजगुरू, वैशाली वरदाळे, दीपा करजोळे, प्रज्ञा शिंदे ,शिवगंगा तावरगिरी, केरप्पा कांबळे, अशोक बोल्लू आदींसह विविध विभागातील प्रशासन प्रमुख ,कर्मचारी ,नर्सेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.सिद्धेश्वर करजखेडे यांनी ३३ वर्ष शासनाच्या आरोग्य खात्यात सेवा केली आहे. पाच वर्ष ते सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते.एकूण सेवेमध्ये अकरा वर्षे त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पद भूषवले आहे. त्याशिवाय सोलापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य अधिकारी म्हणून चार वर्ष उत्कृष्ट सेवा केली आहे. पुणे विभागात उपसंचालक म्हणून एक वर्ष सेवा करून ते सेवानिवृत्त झाले. एकूण ३३ वर्ष त्यांची प्रदीर्घ आरोग्यसेवा झालेली आहे. त्यानंतर ते गेल्या १० वर्षापासून अश्विनी ग्रामीण रुग्णालय मेडिकल कॉलेज येथे आरोग्य अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. सत्काराला उत्तर देताना डॉ. करजखेडे म्हणाले ,माझ्या आत्तापर्यंतच्या सेवेबद्दल मी खूप समाधानी आहे कारण मला देवाने अशी सेवा करण्याचे भाग्य दिले.ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग रुग्णांच्या अडचणी काय आहेत, त्या समजून घेऊन उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ही सेवा अशीच पुढे चालू ठेवणार आहे.अश्विनी रुग्णालयात काम करत असताना जरी मी वयाने मोठा दिसत असलो तरी मला तरुणांसोबत खूप काम करता आले, त्यामुळे मी अजूनही तरुण आहे ,असेच वाटते.जरी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत असलो तरी मी आरोग्य सेवेला खूप महत्त्व दिलेले आहे.गरिबांना,वंचितांना सहकार्य करण्याचा नेहमी प्रयत्न असतो दुसऱ्याच्या अडचणी किंवा संकट दूर करण्याचा प्रयत्न माझ्या हातून होतो आहे ,अशीच शक्ती परमेश्वराने मला यापुढे कायम द्यावी ,अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.यावेळी त्यांनी
अश्विनी रुग्णालयाने माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. डॉ.करजखेडे यांच्या या आरोग्यसेवेतील अतूलनीय कामगिरीबद्दल पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी खास फोन करून त्यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ.करजखेडे यांनी आत्तापर्यंत केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अक्कलकोट तालुक्याच्यावतीने पत्रकार मारुती बावडे,गुरुकृपा सिक्युरिटीचे प्रमुख नवनाथ क्षीरसागर ,मुरलीधर बावडे सचिन पवार,ओंकार विधाते यांच्यातर्फे त्यांचा शाल ,बुके आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.