अक्कलकोट, दि.२२ : उन्हाळी हंगामासाठी अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून उद्या (शनिवारी) सकाळी पाणी सोडण्यात येणार आहे.याबाबतचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा यांनी दिली.
सकाळी ८ वाजता तीन गेटद्वारे आठशे क्युसेक पाणी बोरी नदीत सोडण्यात येणार आहे.कुरनूर धरणामध्ये सध्या ५० टक्के पाणीसाठा आहे.या पार्श्वभूमीवर १५ ते २० टक्के पाणी कमी होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. यापूर्वी रब्बी हंगामासाठी प्रशासनाने पाणी सोडले होते. त्यानंतर आता उन्हाळी हंगामासाठी पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबतचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.बोरी नदीवर आठ कोल्हापुरी बंधारे आहेत हे सर्व बंधारे पाण्याने भरून घेतले जाणार आहेत.कडक उन्हाळ्यात प्रशासन बंधारे भरून घेत असल्याने बोरी नदीकाठच्या ५१ गावांना दिलासा मिळणार आहे. अक्कलकोट,मैंदर्गी आणि दुधनी या तिन्ही नगर परिषदेचा पाणीपुरवठा बोरी नदीवरती अवलंबून आहे.या तीन शहरांना या निर्णयाने मोठा फायदा होणार आहे.या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने बोरी नदीकाठच्या नागरिकांना व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.