अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अखंड नामवीणा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.पहाटे ६ वाजता या नामवीणा सप्ताहाचा शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमेश इंगळे यांचे हस्ते करण्यात आले.प्रारंभी वटवृक्ष मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वीणापूजन मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते होऊन सत्संग महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले.त्यानंतर मंदार महाराजांच्या हस्ते इंगळे यांच्या हाती वीणा देण्यात आला. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये अखंड नामविणा सप्ताहास अनन्य साधारण महत्व असून सतत ७ रात्र आणि दिवस हा वीणा खाली न ठेवता मुखाने स्वामी नाम घेत अखंड चालू ठेवण्याची परंपरा आज देखील देवस्थानने जपली आहे. श्रद्धेय भक्ती भावाने स्वामी भक्त या सेवेत सहभागी होत असतात. या वीणा सप्ताहात इच्छूक भाविकांना १ तास वीणा हाती घेण्याची स्वामी सेवेची संधी देण्यात येते. इंगळे परिवाराच्यावतीने वीणा सप्ताहाची सुरुवात करण्याची ही तिसरी पिढी आहे. या पुढील सात दिवस या नामवीणा सप्ताहात अनेक भाविक सहभागी होवून श्रींच्या चरणी सेवा अर्पण करतात. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिवशी सकाळी या वीणा सप्ताहाची समाप्ती होणार आहे. यावेळी देवस्थानचे विश्वस्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्कलकोट वटवृक्ष स्वामी मंदिरात नामवीणा सप्ताहास सुरुवात
On: April 21, 2022 7:46 PM
---Advertisement---











