अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
उजनीतून येत असलेल्या पाण्यामुळे कुरनूर धरण मंगळवारी ७५ टक्के पाणी पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. त्यातच मागील दोन दिवसात बोरी नदीच्या लाभक्षेत्रात पाऊस पडल्यामुळे या नदी द्वारे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही वाढ झाल्याने रोज दोन ते अडीच टक्क्याने पाणी वाढू लागले आहे.गेल्या वीस-बावीस दिवसांपासून उजनी धरणातून एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे धरणात पाणी सोडले जात आहे.
याद्वारे धरणाची वाटचाल शंभर टक्केच्या दिशेने सुरू आहे. किमान दहा ते पंधरा दिवस उजनीचे पाणी अद्याप कुरनूर धरणाकडे सुरू राहील,असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे यावर्षी धरण १०० टक्के भरण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात तर पाऊस अत्यल्प पडला आहे पण कुरनूर धरण हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे त्याशिवाय तुळजापूर तालुक्यात देखील यावर्षी पावसाची अवकृपा झाल्याने या धरणाला फायदा होऊ शकला नाही.सुदैवाने पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे उजनी धरण यावर्षी तुडुंब भरले आणि त्यातील अतिरिक्त पाणी हे एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे धरणात पोहोचले अन्यथा परिस्थिती खूपच बिकट होती.
कुरनूर धरण यावर्षी शंभर टक्के भरले तर दुधनी, मैंदर्गी आणि अक्कलकोट शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे.शेतकऱ्यांना मात्र सिंचनासाठी पाण्याची अडचण उद्भवू शकते. त्यासाठी कुरनूर धरणाखालील आठ केटी बंधारे भरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.कुरनूर धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच तुळजापूर व अक्कलकोट तालुक्यात पुरेसा पाऊस नसला तरी उजनीच्या पाण्यावर धरणाची वाटचाल समाधानकारक दिशेने सुरू आहे.त्यामुळे तालुक्यातून देखील शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचे वेगळे समाधान पाहायला
मिळत आहे.