ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सीएनजी पंप नसल्याने अक्कलकोटला भाविकांची मोठी गैरसोय ; तीर्थक्षेत्र असून काय उपयोग ; भाविकांचा सवाल !

मारुती बावडे

अक्कलकोट : अक्कलकोटच्या चोहोबाजूने रिंग रोड बायपास होत असले तरी सीएनजी विना भाविकांची मोठी फरपट होत आहे. हजारो वाहने दर्शनासाठी अक्कलकोटच्या दिशेने येत असले तरी त्यांना सीएनजीची सुविधा मिळत नसल्याने वाहनधारकातून संतापाची लाट उसळत आहे. तीर्थक्षेत्र अक्कलकोट असून देखील ही सुविधा मिळत नसल्याने भाविकांतून आश्चर्य देखील व्यक्त होत आहे. शहराच्या आजूबाजूला पाच ते सहा पेट्रोल पंप असताना याबाबतीत मोठी ओरड ऐकायला मिळत आहे.

आत्ताच्या घडीला वाहनधारकांना सीएनजी ही बाब अत्यावश्यक मानली जात आहे. विशेष म्हणजे पुणे, मुंबई, सोलापूर सारख्या शहरांमध्ये सीएनजी पंप मोठ्या प्रमाणात आता सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट भागामध्ये सीएनजी पंपाची खूप गरज आहे पण याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. एकीकडे गगनाला भिडणारे पेट्रोल व डिझेलचे भाव, दुसरीकडे सीएनजी पंपाचा अभाव यामुळे वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनधारक सीएनजी कीट असलेल्या वाहनांना पसंती देत आहेत पण प्रत्यक्षात बाजारात सीएनजी नसल्याने वाहनधारकांची मोठी कोंडी होत आहे.

अक्कलकोट मोठे तिर्थक्षेत्र आहे आणि बाजारपेठ आहे. हजारो भाविक रोज स्वतःच्या वाहनाने दर्शनासाठी येतात. त्यातील ६० ते ७० टक्के वाहने ही सीएनजी किट असलेली आहेत. त्यांची मात्र या पंपाअभावी गैरसोय होत आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा हवा, अशी प्रतिक्रिया व्यक्त आहे.

अक्कलकोटला सीएनजी पंप झाल्यास तुळजापूर, गाणगापूर, सोलापूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी सोय होणार आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता अक्कलकोट मध्यवर्ती ठिकाण आहे. आता सध्याची इंधन दरवाढ पाहता अक्कलकोटला येणाऱ्या वाहनधारकांना किमान सीएनजी पंपच्या माध्यमातून तरी दिलासा मिळावा, अशी अपेक्षा भाविकांतून व्यक्त केली जात आहे. मुंबईहून ज्यावेळी एखादा भाविक अक्कलकोटच्या दिशेने निघतो. त्यावेळी त्याला पुढे सोलापूरपासून अक्कलकोटपर्यंत अजिबात ही सुविधा मिळत नाही. त्याबद्दल खंत व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!