ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात धरण असूनही पाण्याचे दुर्भिक्ष !

क्षमता कमी अन वाटेकरीच जास्त, 'एकरूख'वर पुनर्विचार करण्याची गरज

अक्कलकोट : मारुती बावडे

यावर्षी कुरनूर धरण मृतसाठ्यात गेल्याने पाणीटंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यातच आता धरणाची क्षमता कमी आणि वाटेकरी जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याने भविष्यकाळात अक्कलकोट तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.यासाठी उजनीतून कुरनूरकडे येणाऱ्या पाण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.त्याशिवाय अक्कलकोटचा पाणी प्रश्न सुटणार नाही.यासाठी पुन्हा एकदा दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण होऊ लागली आहे.

सर विश्वेश्वरय्या यांच्या काळात निर्मिती झालेल्या धरणाची क्षमता केवळ ०.८२ टीएमसी आहे. पूर्वी हे धरण मोठे होणार होते. परंतु त्या काळच्या सत्ताधारी मंडळी आणि शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर या धरणाची क्षमता कमी करण्यात आली आणि त्याचे दोन भाग झाले. एक धरण नळदुर्गला नेण्यात आले आणि त्यानंतर दुसरे धरण कुरनूरला बांधण्यात आले असे असताना आता कुरनूर धरणाची क्षमता आणि त्यावर निर्माण झालेला ताण लक्षात घेता हे धरण मोठे असायला हवे होते याची चर्चा सुरू आहे किंवा या धरणामध्ये आता पर्यायी उजनी धरणातून पाण्याची जी व्यवस्था झालेली आहे ती अधिक सक्षम करण्याची चर्चा आता तालुक्यातून होऊ लागली आहे. खरं तर तब्बल २९ वर्षाच्या प्रयत्नानंतर एकरूख उपसा सिंचन योजना अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी कार्यान्वित झाली.परंतु गेल्या दोन वर्षापासून या योजनेचा म्हणावा तसा लाभ अक्कलकोटला झाला नाही हे वास्तव आहे.या योजनेद्वारे कुरनूर धरणाला आता पर्यंत एकूण पाणी किती मिळाले याचे उत्तर कोणी देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. ज्या ज्या वेळी उजनी धरणाचे रोटेशन या भागाकडे येईल त्या त्यावेळी अत्यंत कमी दाबाने हे पाणी एकरूख योजनेतून पुढे सरकत असल्याने हे पाणी ज्यावेळी धरणाजवळ येऊन पोहोचते त्याचवेळी नेमके वरून पाणी बंद होते असा प्रकार अनेक वेळा झाला आहे. पाणी सोडण्याचा कालावधी जो आहे तो प्रशासनाकडून निश्चित झाला आहे त्यामुळे अधिकारी देखील याबाबतीत काही ऐकायला तयार नाहीत आणि विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये दर्गनहळळी आणि रामपूर या भागाला याचा फायदा अधिक झाला आहे,असे दिसून आले आहे.या भागासाठीही ही योजना आहेच पण मूळ १९९६ साली जी संकल्पना पुढे आली ती कुरनूर धरणाला किमान तीन टीएमसी पाणी हे मिळाले पाहिजे या हेतूने ही योजना पुढे सरकली. नंतरच्या काळामध्ये त्याला निधीच्या अडचणी आल्या.ती योजना अखेर पूर्णत्वास पण गेली पण आत्ता मात्र या योजनेच्या यशस्वीतेच्या बाबतीत ज्यावेळी चर्चा केली जाते. त्यावेळी मात्र आता या योजनेच्या बाबतीत पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीने या योजनेवर राजकारण झाले,गवगवा झाला त्याचा विचार विचार करता फारसा फायदा हा अक्कलकोट तालुक्याला होताना दिसत नाही वास्तव आहे. यात या योजनेचे जे पंपग्रह आहेत. ते पूर्ण क्षमतेने चालू नाहीत किंवा पाण्यासाठी जो कालवा आहे. तो कालवा देखील खूप छोटा आहे. विजेची अनेक वेळा समस्या निर्माण होते अशा अनेक अडचणींमुळे आणि कुरनूर धरण ते उजनी जलाशय यामधील जे अंतर आहे ते अंतर देखील खूप मोठे आहे.यामुळेच उजनीचे पाणी मोठ्या प्रमाणात हे कुरनूर धरणामध्ये येऊ शकले नाही आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकला नाही.ही योजना साकार होण्याच्या आधी शेतकऱ्यांचे एक मोठे स्वप्न होते ते म्हणजे उजनीचे पाणी येणार आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे नंदनवन होणार पण आता नेमके वेगळे चित्र निर्माण झाले आहे.या योजनेमुळे जर पाणी आले असते तर कुरनूर धरण आज तुडुंब राहिले असते आणि शेतकऱ्यांना जी आपण दोन आवर्तने देणार आहोत ते पूर्ण क्षमतेने दिली गेली असती पण उजनी धरणात पाणी असतानाही हे पाणी आज शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही याचं कारण म्हणजे या योजनेवरती आणखी भविष्यकाळात काम करावे लागणार आहे.त्यासाठी कालव्याचे रुंदीकरण असेल किंवा या ठिकाणचे पंपग्रह हे पूर्ण क्षमतेने चालवून पाणी सोडण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी वाढवून कुरनूर धरणाला जे हक्काचे पाणी उजनी धरणामध्ये आरक्षित आहे ते पाणी मिळण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. यासाठी पुन्हा निधीची गरज पडणार आहे.हे एकीकडे चित्र असले तरी दुसरीकडे कुरनूर धरण हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे.जर उजनी भरली नाही तर कुरनूरकडे पाणी यायचा प्रश्नच नाही पण निसर्गाच्या भरोशावर जरी धरण भरले.

तरी आत्ता या धरणामध्ये वर्षाखेर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहील अशी स्थिती राहणार नाही. त्याचं कारण म्हणजे या धरणामध्ये कुरनूर, बावकरवाडी, चुंगी,हन्नूर या परिसरातील शेतकऱ्यांच्या पाईपलाईनी आहेतच.या शेतकऱ्यांचीही जमिनी धरणामध्ये संपादित झाल्या आहेत त्यांचाही हक्क आहे त्यांनाही पाणी पुरेशी मिळावे असे वाटते
पण पाणी सोडल्यावर त्यांच्यावरही अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.त्याशिवाय बोरी नदीकाठी जी ५१ गाव आहेत त्या शेतकऱ्यांचा पाणी उपसा देखील मोठ्या प्रमाणात आहे अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना या धरणावरती अवलंबून आहेत. पुन्हा बाष्पीभवनाद्वारे पाणी कमी होण्याचे प्रमाण वेगळे आहे.अक्कलकोट शहराची पाणीपुरवठा योजना या ठिकाणाहून आहे. समर्थ नगरची योजना नवीन कार्यान्वित होत आहे. वळसंग, दुधनी आणि मैंदर्गी या तीन नवीन पाणीपुरवठा योजना सुद्धा याच धरणावरून कार्यान्वित होणार आहे. या पाणीपुरवठा योजना धरणावरून नेण्यास विरोध नाही. पिण्याचे पाणी हे सर्वांना मिळालेच पाहिजे आणि ते दिले गेले पाहिजे हा एकीकडे मतप्रवाह असला तरी हे सर्व करत असताना धरणात पाणी शिल्लक असणे देखील तितकच गरजेचे आहे आणि त्याचा विचार आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना करावा लागणार आहे.

दरवेळी कालवा सल्लागार समितीची जी बैठक होते त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची खूप आग्रही मागणी असते परंतु आता पाण्याचे नियोजन करणे हे अवघड झाले आहे. धरणाच्या निर्मितीपासून दोन आवर्तने सोडण्याचा पायंडा तालुक्यात पडलेला आहे परंतु या पुढच्या वर्षी किंवा पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दोन आवर्तने मिळणे कठीण आहे. कारण सध्या धरणाची क्षमता कमी आणि वाटेकरी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.खरे तर १९९६ साली उजनी धरणाचे पाणी अक्कलकोटसाठी आरक्षित झाले आहे.त्यामुळे उजनी धरणावर आत्ता जरी पाणी उपशाचा मोठा ताण असला तरी अक्कलकोटसाठीचे पाणी हे २९ वर्षांपूर्वी आरक्षित आहे त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी आता पुढील काळात कुरनूर धरण असताना देखील पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे हे मात्र निश्चित.

आठ बंधाऱ्यांची पुनर्बांधणी आवश्यक

कुरनूर धरणाच्या खाली एकूण आठ कोल्हापुरी बंधारे आहेत. हे बंधारे खूप जुने झाले आहेत. बंधार्‍याची पुनर्बांधणी होणे अपेक्षित आहे.काही बंधाऱ्यामध्ये गाळ साठला आहे.काही बंधाऱ्याची उंची वाढवल्यास त्या ठिकाणचे सिंचन क्षेत्र वाढणार आहे.या सर्व बंधाऱ्याची पुनर्बांधणी झाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्र नक्कीच वाढणार आहे.

शाश्वत स्वरूपाचा पाणीपुरवठा हवा

धरणाची निर्मिती २५ वर्षांपूर्वी झालेली असली तरी वरचेवर लोकसंख्या वाढ होणार आहे. अनेक मोठ्या गावांना पाण्याची गरज निर्माण होणार आहे अशावेळी कुरनूर धरणावरूनच योजना कार्यान्वित करण्याचा सपाटा प्रशासन लावणार. त्यावेळी स्थानिकांकडून देखील याला विरोध सुरू होऊन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे आतापासून या धरणाला शाश्वत स्वरूपाचा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

सिंचन क्षेत्र वाढण्यास आली मर्यादा

धरणात असलेल्या पाणीसाठ्याचा जर विचार केला तर सिंचन क्षेत्राला एक विशिष्ट अशा प्रकारची मर्यादा आली आहे ती मर्यादा जर वाढवायची असेल आणि तालुक्यातील बागायत क्षेत्र वाढवायचा असेल तर पाण्याची उपलब्धता खूप गरजेची आहे. येत्या काळात त्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

कर्ज घेऊन पाईपलाईन केल्या, पुढे काय ?

या धरणामध्ये ६७२ हेक्टर जमीन संपादित झाली. अनेक शेतकरी उध्वस्त झाले. काही शेतकऱ्यांच्या जमिनी शिल्लक आहेत.त्या शेतकऱ्यांनी बँकेचे उंबरठे झिजवून लाखो रुपये कर्ज घेऊन पाईपलाईन केल्या. परंतु आज धरणात पाणी शिल्लक नसल्याने त्यांच्यावर ‘धरण उशाला कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!