मुंबई : वृत्तसंस्था
ठाण्यात आज गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसत आहे. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विकासाच्या प्रगतीत जो आडवा येईल, त्याला आडवा करून गुढी पाडवा साजरा करू असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.
यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ”हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. प्रगती आणि विकासाला जो कोणी आडवा येईल, त्याला आडवा करून आमचे लोक गुढी पाडवा साजरा करतील. आजचा दिवस प्रभू रामचंद्राने रावणावर मिळवलेला विजय आपण पाडवा म्हणून साजरा करतो. देशभरात अशा प्रकारचा उत्साह पाहत आहोत. 4 जूनला आम्ही विजयाचा गुढीपाडवाही साजरा करू”, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर टीका केली. “गेल्यावेळी सरकार स्थापन होण्यापूर्वी आधीच्या सरकारमध्ये अडीच वर्षांत सर्व सण-उत्सवांवर बंदी होती. मात्र आपले सरकार आल्यानंतर सणांवर असणारी बंदी उठवली. लोक मोकळा श्वास घेऊ लागले. आम्ही सणांप्रमाणेच विकासावरचीही बंधने काढली”, असे ते म्हणाले.
दरम्यान, ठाण्याची चिंता करु नका, सर्व नीट होईल असे शिंदे म्हणाले. ”महाराष्ट्रात महायुती मजबुतीने उभी आहे. ठाण्याबाबत समन्वयाने निर्णय घेतले जातील. यंदा जनतेनेच मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे ठरवले आहे. काल चंद्रपुरात विजयाची नांदी सुरू झाली. मोदींच्या प्रति जनतेत आकर्षण आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेला लोकांचा तुफान प्रतिसाद लाभला. सर्वत्र मोदीमय वातावरण होते. मोदी यांचे काम लोकांपर्यंत पोहोचत असून याच कामाची पोहोचपावती प्रत्येक सभेतून लोक देत आहेत. यंदा 45 पार हा महायुतीचा संकल्प आहे”, असेही शिंदेंनी स्पष्ट केले.