मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. सत्याचा मोर्चा या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष एकाच व्यासपीठावर येत आहेत. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येत आहेत. मतदारयाद्यांतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांविरोधात हा मोर्चा काढण्यात आला असून, तो फॅशन स्ट्रीटपासून सुरु होऊन मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाला प्रचंड जनसमर्थन मिळेल, असा दावा आयोजकांनी केला आहे. मात्र, या आंदोलनाच्या राजकीय पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील मतभेदांनी महाविकास आघाडीतील एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू असून, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर व्यासपीठाची उभारणी पूर्ण झाली आहे. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे हे स्वतःमध्येच एक मोठे राजकीय चित्र मानले जात आहे. या तिन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या विचारसरणी आणि राजकीय इतिहासातून प्रवास केला असला तरी, मतदारयादीतील घोळ आणि प्रशासनाच्या भूमिकेविरोधात त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. सत्याचा मोर्चा केवळ मतदारयादीविषयीचा आंदोलन नसून, आगामी निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या एकजुटीचा दाखला म्हणूनही पाहिला जात आहे.
मात्र, या आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील सुसंवादावर सावली पडली आहे. मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यातील मतभेद उघडकीस आले असून, कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडून मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला असला तरी मुंबई काँग्रेसने अधिकृत संदेश न पाठविल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते गोंधळले आहेत. काही मोजक्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र पक्षपातळीवर एकसंघ निर्णय नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. काँग्रेसची ही अडखळलेली भूमिका आघाडीतील एकतेवर परिणाम करू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.